फडणवीस-शिंदे-पवार तिघेही म्हणाले- विरोधकांचा योग्य सन्मान करू:त्यांचेही ऐकू, उत्तर देऊ; खातेवाटप 2-3 दिवसांत होईल, ईव्हीएम म्हणजेच-एव्हरी व्होट फॉर महाराष्ट्र

फडणवीस-शिंदे-पवार तिघेही म्हणाले- विरोधकांचा योग्य सन्मान करू:त्यांचेही ऐकू, उत्तर देऊ; खातेवाटप 2-3 दिवसांत होईल, ईव्हीएम म्हणजेच-एव्हरी व्होट फॉर महाराष्ट्र

नागपूर येथे महायुती सरकारमधील मंत्रिमंडळाची शपथविधी पार पडली. त्यानंतर महायुतीच्या नेत्यांची बैठक देखील पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर टीका केली आहे. महाविकास आघाडीमधील नेत्यांनी शपथविधीनंतरच्या चहापानच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. विरोधी पक्ष सातत्याने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याची टीका अजित पवारांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, आमचे बहुमत आहे म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने रेटू असे नाही. विरोधकांनी देखील प्रश्न विचारायचे असतात. विरोधक संख्येने जरी कमी असले तरी त्यांना दुर्लक्ष करणार नाही, अशी ग्वाही अजित पवारांनी दिली आहे. तसेच येत्या 2 ते 3 दिवसात खातेवाटप होणार असल्याची माहिती देखील यावेळी अजित पवारांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज मंत्रिमंडळ विस्तार झाला. गेल्या काही दिवसात तुम्हीच मंत्रिमंडळ विस्तार करत होतात असा टोला देखील पत्रकारांना शिंदेंनी लगावला आहे. पुढे ते म्हणाले, नागपूरमध्ये होणारे अधिवेशन आणि नागपूरकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अभिनंदन करतो. 27 व्या वर्षी महापौर आणि आता मुख्यमंत्री झाले. पुन्हा येईन म्हणत काहींनी त्यांची टिंगल केली पण पुन्हा आले. आमच्या महायुतीची नवी इनिंग सुरू झाली आहे. गेले अडीच वर्ष आम्ही टीम म्हणून काम केले. फडणवीस यांना असलेला अनुभव आम्हाला कामी आला आणि अजितदादा नंतर आले आणि आम्ही टीम म्हणून काम केले. आम्ही जे म्हणालो त्यावर जनतेने देखील विश्वास दाखवला. विदर्भमध्ये हे अधिवेशन होत आहे आणि विदर्भाला न्याय देण्यासाठी आम्ही अनेक निर्णय घेतले. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आमचे एकच ध्येय आहे समृद्ध महाराष्ट्र. महाविकास आघाडीने जे कामे बंद केली होती त्याला आम्ही पुन्हा सुरू करत पूर्ण केले. लोकांनी देखील आमच्या कामाची पोचपावती दिली. तुमचे अंदाज देखील फोल ठरले आणि बहुमत आम्हाला मिळाले. जसे मी मुख्यमंत्री असताना मला देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दिला तसेच मी सुद्धा देणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, हिवाळी अधिवेशन आहे आणि थंडी देखील आहे त्यामुळे या अधिवेशनात आम्ही जनतेला ऊब आणि ऊर्जा मिळेल अशा पद्धतीने काम आम्ही निश्चित करू. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे आणि आज आमच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली ज्यात 6 राज्य मंत्री आहेत. आजपासून आमची गतीशील कारभार आम्ही सुरू केला आहे. येत्या 2 दिवसांत आम्ही खातेवाटप करू. चांगले कामकाज करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विरोधी पक्षांनी आम्हाला एक पत्र दिले, मागच्याच वर्षीचे पत्र फक्त त्यात ईव्हीएमचा मुद्दा त्यात दिला आहे. म्हणून त्यांनी हिवाळी अधिवेशनाला चुकून पावसाळी अधिवेशन म्हणाले होते. कारण जुनेच पत्र त्यांनी दिले आहे. आम्ही निश्चितपणे त्यांच्या पात्राचे उत्तर आम्ही देऊ. ईव्हीएमबद्दल देखील आम्ही त्यांना उत्तर देऊ. या ईव्हीएमचा अर्थ असा आहे एव्हरी व्होट फॉर महाराष्ट्र. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, सोयाबीनच्या खरेदीमध्ये आपण गेल्या वर्षीचा रेकॉर्ड तोडला आहे. दुधाचा विषय आहे त्याला 5 रुपये 7 रुपये अशा पद्धतीने मदत करण्याचे काम आपण केले. धानाच्या शेतकऱ्यांनी देखील आपण मदत केली. त्यामुळे आपले सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असणारे आपले सरकार आहे. परभणीच्या मुद्द्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशा प्रकारे एखाद्या मनोरुग्णाच्या कृतींवर असंवेधानिक पद्धतीने उद्रेक करणे हे योग्य नाही. आपले सरकार संविधानाचे आदर करणारे सरकार आहे. बीड जिल्ह्यातील घटना अतिशय विध्वंस प्रकारची आहे. सरपंचाची जि हत्या झाली त्यात आपण अनेकांना अटक केली असून केस सीआयडीला दिली आहे. या प्रकरणातील सगळी चौकाशी आपण करणार आहोत. कुठल्याच आरोपीला सोडले जाणार नाही. या महाराष्ट्रात अशा घटना गांभीर्याने घेतले जातील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकसभेप्रमाणे चर्चा न काढता पळ काढायचा असे कृत्य विरोधकांनी करू नये आणि मीडियासमोर जाऊन बोलणे हे काही लोकशाही नाही. उलट चर्चा करून ते मीडियामध्ये आले तर त्याला लोकशाही म्हणता येईल. त्यामुळे विरोधकांना आवाहन करतो की त्यांनी चांगल्या प्रकारची चर्चा सभागृहात करावी. विरोधीपक्ष नेते पदाबद्दल सरकारची भूमिका काहीच नसते. त्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा असतो. अध्यक्षपदांच्या निर्णयात आमचा काहीच अडथळा नसेल. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करू, असेही फडणवीस म्हणाले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment