शेतकऱ्यांवर अश्रुधुराचे गोळे;दिल्लीला कूच करू द्या किंवा चर्चा करा- मोर्चेकरी:शंभू सीमेवर अडीच तास संघर्ष, एक दिवस पुढे ढकलला मोर्चा
एमएसपीच्या कायदेशीर हमीसह विविध मागण्यांसाठी शंभू सीमेवर दीर्घकाळापासून धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या एका गटाने शुक्रवारी दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंजाब-हरियाणा सीमेवर अश्रुधुराचे गोळे लागल्याने काही शेतकरी जखमी झाले. त्यामुळे हा मोर्चा एक दिवसासाठी पुढे ढकलण्यात आला. तत्पूर्वी, दुपारी १ वाजता संयुक्त किसान मोर्चा (बिगर राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा (केएमएम) यांच्या नेतृत्वाखाली १०१ ‘मर्जिवडे’ शेतकऱ्यांचा गट हरियाणाच्या बाजूकडील बॅरिकेड्सकडे सरकला. हरियाणाच्या बाजूने तैनात डीएसपी रामकुमार म्हणाले, येथे बीएनएस १६३ लागू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी परत जावे. मात्र, शेतकरी पुढे जाण्यावर ठाम राहिले. बॅरिकेड्सजवळ पोहोचलेला एक शेतकरी पोलिसांसाठी बनवलेल्या टिनच्या छतावर चढला. यानंतर काही शेतकऱ्यांनी दोरी व लोखंडी साखळदंडाने बॅरिकेड्स तोडण्यास सुरुवात केली. दरम्यान, सुरक्षा दलांनी मिरचीचा स्प्रे मारून त्यांना मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. शेतकरी हलला नाही तेव्हा पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यास सुरुवात केली. यात शेतकरी नेते सुरजितसिंग फुल यांच्यासह ६ शेतकरी जखमी झाले. प्राथमिक उपचारानंतर ४ शेतकऱ्यांना घरी सोडण्यात आले. काही पत्रकारांनाही किरकोळ दुखापत झाली. हरियाणा सरकारने अंबाला जिल्ह्यातील ११ गावांमध्ये ९ डिसेंबरपर्यंत मोबाईल इंटरनेट आणि ‘बल्क एसएमएस सेवा’ बंद केली आहे. अर्धा तास सुरूच होत्या अश्रुधुराच्या नळकांड्या शंभू सीमेवरून शेतकरी मर्यादित संख्येने पायी एनएच-४४ वर दिल्लीकडे जात होते. या वेळी सुरक्षा दलांनी दुपारी अडीच ते तीन वाजेपर्यंत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. जखमी शेतकऱ्यांची संख्या वाढल्याने केएमएमचे सरचिटणीस सर्वनसिंग पंधेर यांनी शेतकऱ्यांच्या गटाला परत बोलावले. यानंतर पंधेर यांच्यासह ३ शेतकरी नेत्यांनी डीएसपींशी चर्चा केली. पंधेर म्हणाले, आम्ही स्पष्टपणे सांगितले की, एकतर शेतकऱ्यांना दिल्लीला जाऊ द्या किंवा चर्चेसाठी पुढे या. पोलिसांनी स्थिती स्पष्ट करण्यासाठी आम्हाला कळवले आहे. यानंतर दिल्लीचा मोर्चा एक दिवसासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. विनापरवानगी कसे जाऊ देणार विज हरियाणाचे कॅबिनेट मंत्री अनिल विज म्हणाले की, शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्याची परवानगी घेतलेली नाही. परवानगीशिवाय त्यांना दिल्लीला कसे जाऊ देणार? परवानगी आवश्यक आहे. दरम्यान, किसान काँग्रेसचे अध्यक्ष बजरंग पुनिया म्हणाले, सरकार शेतकऱ्यांना त्यांचे हक्क देऊ नाही. मराठवाडा… या वर्षी आतापर्यंत ८२२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या मराठवाड्यात या वर्षी ८२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी सांगितले, यापैकी ३०३ शेतकऱ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत ३.०३ कोटींची मदत देण्यात आली. ३१४ प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे. बीडमध्ये सर्वाधिक १६० व नांदेडमध्ये १४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.