बाप लेकीचे जिव्हाळ्याचे नाते:शरद पवारांची गाडी दिसताच सुप्रिया सुळेंनी ताफा थांबवला, भर उन्हात रस्त्यावर उतरत घेतली भेट

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा ताफा पाहताच सुप्रिया सुळे यांनी आपला ताफा थांबवत भर उन्हात रस्त्यावर उतरून आपल्या वडिलांची भेट घेतल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सुप्रिया सुळे या त्यांच्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत, तर शरद पवार देखील कामांनिमित्त दौऱ्यावर असतात. या दौऱ्यांदरम्यान वडिलांचा ताफा बघून सुप्रिया सुळे यांनी आपला ताफा थांबवून आई वडिलांची भेट घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे या बारामती मतदारसंघातील इंदापूर इथला दौरा पुरंदरकडे निघाल्या होत्या. याचवेळी मोरगाव रस्त्यावरून शरद व त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार हे बारामतीच्या दिशेने जात होते. यावेळी वडिलांचा ताफा असल्याचे सुप्रिया सुळे यांच्या लक्षात आले व त्यांनी त्यांचा ताफा थांबवला. यावेळी सुप्रिया सुळे त्यांचे गाडीतून उतरून आई-वडिलांची भेट घेण्यासाठी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या शरद पवारांच्या गाडीच्या दिशेने चालत गेल्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी आई वडिलांची चौकशी केली तसेच त्यांच्या दौऱ्याविषयी देखील चर्चा केल्याचे दिसून आले. दरम्यान, यापूर्वी देखील सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात देखील बाप-लेकीचे प्रेम दिसून आले होते. सुप्रिया सुळे या त्यांच्या हाताने शरद पवार यांच्या पायात चप्पल घालून देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले होते. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या पायाशी बसून चप्पल घालून दिली होती. त्यामुळे या बाप लेकीचे प्रेम अनेकवेळा दिसून आले आहे. तेव्हा देखील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. राज-उद्धव युतीवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्या म्हणाल्या होत्या की, माझ्यासाठी ही बातमी अतिशय आनंदाची आहे. माझ्या अंगावर काटा आला. आमचे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबाचे गेल्या पाच- सहा दशकांपासून कौटुंबिक संबंध आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही आजही आमच्या कुटुंबासाठी प्रिय आहेत, बाळासाहेब आज हा दिवस बघण्यासाठी असते तर आज आम्हाला खूप आनंद झाला असता. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघे एकत्र येत असतील तर राजकीय आणि कौटुंबीक इतिहासातला हा सोनेरी दिवस आहे. दोन बंधू महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असतील तर आपण त्यांचे स्वागत केले पाहिजे.