माजी आमदार नितीन पाटील यांची नाराजी दूर:आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत येणार एका व्यासपीठावर
कन्नड-सोयगाव विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार संजना हर्षवर्धन जाधव यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी कन्नड शहरात येत आहेत. त्या स्टेजवर कन्नड माजी आमदार नितीन पाटील आज जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. कन्नड विधानसभेची जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) पक्षाला सुटेल या आशेने नितीन पाटील यांनी दीड – दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. परंतु कन्नड विधानसभेची जागा शिंदे गटाला सुटली. त्यामुळे त्यांची मोठी गोची झाली. त्यानंतर आज ते एकनाथ शिदेंसोबत एका व्यासपीठावर येणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या कन्या तथा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या संजना जाधव यांनाी शिवसेनेत प्रवेश दिला. ते तेवढ्यावरच थांबले नाहीत. उमेदवारी भरण्याच्या एक दिवस अगोदर त्यांना एबी फार्म देऊन उमेदवारी दिली. त्यामुळे महायुतीतील शिंदे यांच्या शिवसेनेतील भरतसिंग राजपुत, केतन काजे, केशव राठोड, डॉ. मनोज राठोड भाजपातील संजय गव्हाणे, संजय खंबायते, किशोर पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार नितीन पाटील, माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे इच्छुक व पदाधिकारी कमालीचे नाराज झाले होते. त्यामुळे संजना जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरताना भाजपाचे संजय खंबायते, किशोर पवार वगळता शिवसेनेचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे एक हि नेते पदाधिकारी उपस्थित नव्हते. परंतु दोन ते तीन दिवसांत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भरतसिंग राजपुत, उपजिल्हा प्रमुख केशव राठोड यांच्यासह शेकडो पदाधिकारी प्रचार कार्यालयाच्या उदघाटनाच्या दिवशी हजर झाले. नुसते हजर नव्हते तर त्यांनी भाषणे देखील केले. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले माजी आमदार नितीन पाटील हे आज मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेच्या स्टेजवर येणार आहेत. यावेळी ते संजना जाधवांचा प्रचार सुरू करणार असल्याचीही तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. संतोष कोल्हे, केतन काजेंची नाराजी कायम महायुतीच्या नाराज इच्छुकांमध्ये माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख केतन काजे यांचे नाव आघाडीवर होते. हे दोघेही पक्षावर नाराज असल्यामुळे ते मुख्यमंत्री यांच्यासोबत व्यासपीठावर एकत्र येतील किंवा नाही याविषयी साशंकता आहे.