शिवाजी मैदानावरून ठाकरे बंधूंत कुस्ती:मनसे, उद्धवसेनेचे मनपाकडे अर्ज
विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच १७ नोव्हेंबरला शिवाजी पार्कचे मैदान प्रचारसभेकरिता मिळण्यासाठी उद्धवसेना आणि मनसेनेे मुंबई महापालिकेकडे अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे १७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन आहे. त्याच दिवशी ठाकरे बंधू शिवाजी पार्कसाठी आग्रही असल्याने पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या पक्षांचे अर्ज आले आहेत त्यांच्या परवानगीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार असून नगरविकास विभागच यावर निर्णय घेईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले की, या मैदानासाठी आतापर्यंत सुमारे १५ ते १६ अर्ज आले आहेत. शिवसेनेचे दोन्ही गट, भाजप, मनसे या प्रमुख पक्षांचे वेगवेगळ्या तारखांचे अर्ज यात आहेत. १८ नोव्हेंबर रोजी प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे १७ तारखेसाठी आमच्यावर सर्वच बाजूंनी मोठा दबाव येत आहे. माहीममध्ये प्रचाराची आवश्यकता नाही माहीम मतदारसंघात राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे रिंगणात असून उद्धवसेनेचे महेश सावंतही लढत आहेत. उद्धव ठाकरेंचा माहीममध्ये प्रचार दौरा होणार नाही. याविषयी वचननामा प्रकाशनाच्या पत्रकार परिषदेत विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, माहीममध्ये प्रचार करण्याची आवश्यकता वाटत नाही. कारण माहीम हा आमचा हक्काचा मतदारसंघ आहे. उद्धव ठाकरेंनी दिला विनंतीवजा इशारा.. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा १७ नोहेंबरला स्मृतिदिन आहे. तो संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिक तिथे येतील. त्याला आचारसंहिता लागू शकत नाही. तिथे तुमच्या आडमुठेपणामुळे संघर्ष होऊ देऊ नका. कुठेही संघर्षाची ठिणगी पडू द्यायची नसेल तर १७ तारखेला शिवाजी पार्क आम्हालाच मिळायला हवा.