भावी नगरदेवाला धडक देणाऱ्या टिप्पर चालकास गुन्हे शाखेने घेतले ताब्यात:गोरेगाव पोलिसांच्या हवाली करणार

सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे भावी नवरदेवाच्या दुचाकीस धडक देऊन पळ काढणाऱ्या टिप्पर चालकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी ता. २१ दुपारी ताब्यात घेतले आहे. त्याला गोरेगाव पोलिसांच्या हवाली केले जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी येथील गणेश तनपुरे (२५) यांचा आज देवकार्याचा कार्यक्रम होता. सोमवारी ता. २४ दुपारी एक वाजता विवाह होणार आहे. मात्र आज सकाळीच गणेश हे दुचाकी वाहनावर वाघजाळी येथे नातेवाईकास आणण्यासाठी निघाले होते. पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये गणेश यांचा जागीच मृत्यू झाला. गोरेगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद झळके, उपनिरीक्षक नितेश लेनगुळे, जमादार अनिल भारते यांच्या पथकाने आजेगाव येथे जाऊन मयत गणेश यांचा मृतदेह गोरेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला होता. दरम्यान, या प्रकरणातील टिप्पर चालकास अटक करावी या मागणीसाठी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, नामदेव पतंगे, प्रविण महाजन यांच्यासह मयत गणेश यांच्या नातेवाईकांनी गोरेगाव पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले होते. त्यानंतर पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी तातडीने अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेेचे निरीक्षक विकास पाटील यांना गोरेगाव येथे रवाना केले. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक पाटील यांनी गोरेगाव पोलिसांसोबत चर्चा केली. याप्रकरणात चालकाच्या अटकेसाठी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कपील आगलावे, जमादार विकी कुंदनानी, गणेश लेकुळे, महादू शिंदे यांच्या पथकाने दुपारी टिप्पर चालक अभिजीत सरकटे यास टिप्पर सह ताब्यात घेतले आहे. त्याला गोरेगाव पोलिसांच्या हवाली केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आजेगाव येथे ट्रीप टाकून परत येत होता टिप्पर सदर टिप्पर नर्सी, जवळापळशी मार्गे आजेगाव येथे गेले होते. त्या ठिकाणी टी पॉईंटवर मयत गणेश यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक बसल्याचे टिप्पर चालकाने पोलिसांना सांगितले.