गांगलवाडी शिवारात जलवाहिनी फुटली:हिंगोलीकरांना चार दिवस निर्जळीचा सामना करावा लागणार, पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन

गांगलवाडी शिवारात जलवाहिनी फुटली:हिंगोलीकरांना चार दिवस निर्जळीचा सामना करावा लागणार, पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन

हिंगोली शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी गांगलवाडी शिवारात पुलाच्या बांधकामाच्या वेळी फुटली असून पुढील चार दिवस हिंगोलीकरांना निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे नागरीकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी केले आहे. हिंगोली शहराला सिध्देश्‍वर धरणावरून पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी धरणावरून हिंगोली शहरापर्यंत जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. डिग्रस कऱ्हाळे या भागात जलशुध्दीकरण करून शहराला पाणी पुरवठा केला जातो. गांगलवाडी शिवारात सिध्दनाथ नदी जवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. या पुलाच्या बांधकामाच्या वेळी शुक्रवारी ता. २५ दुपारच्या सुमारास मुख्य जलवाहिनी फुटली आहे. दरम्यान, जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळाल्यानंतर पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, अभियंता प्रतिक नाईक, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, वसंत पुतळे यांच्यासह पालिका कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर या ठिकाणी दुरुस्तीसाठी लागणाऱ्या जलवाहिनी व इतर साहित्याची जुळवाजुळव करून जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी किमान चार दिवसांचा कालावाधी लागणार आहे. त्यामुळे हिंगोली शहराचा पाणी पुरवठा पुढील चार दिवसांपर्यंत विस्कळीत होणार आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न आहेत. त्यासाठी पालिकेची सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. मात्र त्यानंतरही गरीकांनी पुढील चार दिवस पाणी पुरवठा होणार नसल्याचे लक्षात घेऊन पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिका मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी केले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment