शिवाजीनगर न्यायालयाच्या आवाराबाहेर गॅसच्या बाटलीचा स्फोट:पोलिस नाईकासह तिघेजण जखमी
न्यायालयाच्या आवाराबाहेर गेट क्रमांक तीन जवळ वडापावच्या गाडीवर छोट्या गॅसच्या बाटली गरम होऊन तिचा स्फोट होऊन कामगार, पोलिस कर्मर्यासह अन्य एक जण असे तीघे जखमी झाले. त्यांना तात्काळ औंध येथील एम्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वडापाव हातगाडीवरील कामगार गोविंदा अंकुशे (42), हातगाडा मालक संतोष सोनवणे (37) आणि पोलिस नाईक निलेश सुभाष दरेकर हे या स्फोटात जखमी झाले. न्यायालयाच्या बाहेर गेट क्रमांक तीन येथे वडापावची गाडी लावली जाते. लायटरमध्ये गॅस भरला जात असलेली छोटी बाटली ठेवली होती. यावेळी बाटली अचानक गरम होऊन बाटलीचा स्फोटा झाला. यावेळी वाकड पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक निलेश दरेकर व हातगाडा मालक संतोष सोनवणे हे थांबले असताना बाटलीचा स्फोट झाला. यावेळी कामगार, पोलिस कर्मचारी आणि गाडा मालक भाजले गेले. दुपारी दोन ते पावणे तीन वाजण्याच्या दरम्यान न्यायालयाला जेवणाची सुटी झाल्यानंतर दुपारी अडीच वाजता हा प्रकार घडला. गेट नंबर 3 कडे स्फोटाचा आवाज झाल्याने न्यायालयातील वकीलांनी तसेच न्यायालयातील कर्मचार्यांनी गेटनंबर तीन कडे धाव घेतली. यावेळी जखमी झालेल्या तिघांना तात्काळ औंध येथील रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. जखमी झालेल्या व्यक्तींना हाताला आणि तोंडाला भाजले असून त्यावर उपचार करण्यात येत आहे.दरम्यान तिघांचीही प्रकृती ठिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिली.