जागतिक महिला दिनानिमित्त राज्यभरात विशेष ग्रामसभा:ग्रामपंचायतींमध्ये होणार महत्त्वाचे ठराव, राज्य महिला आयोगाचा पुढाकार

जागतिक महिला दिनानिमित्त राज्यभरात विशेष ग्रामसभा:ग्रामपंचायतींमध्ये होणार महत्त्वाचे ठराव, राज्य महिला आयोगाचा पुढाकार

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत 8 मार्च रोजी राज्यभरातील सर्व ग्रामपंचयातींमध्ये विशेष ग्राम सभा आयोजित करण्यात येणार आहे. या विशेष ग्राम सभेतून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या संकल्पनेनुसार बालविवाह रोखणे, विधवा प्रथा बंद करणे तसेच महिला सुरक्षिततेसाठीचा ठराव या ग्रामसभांमध्ये करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या विशेष सभेची मागणी केली होती. महिला आयोगाच्या मागणीनुसार ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश दिनांक 6 मार्च रोजी पत्राद्वारे दिले आहेत. या प्रकरणी महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर यांनी माहिती दिली आहे. रूपाली चाकणकर म्हणाल्या, पुरोगामी व प्रगत राज्य असलेल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बालविवाह होत आहेत. महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर असतानाही, विधवा महिलांना रूढी व अंधश्रद्धेमुळे जाचक प्रथांना सामोरे जावे लागत आहे. या सोबतच महिलांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक स्तरावर जनजागृती व्हावी यासाठी विशेष ग्रामसभा बोलावून गावात बालविवाह होऊ न देणे, पतीच्या निधनानंतर महिलांना जाचक असणाऱ्या प्रथा बंद करणे, गावात मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी प्रयत्न करणे आणि महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे असे ठराव करण्यात यावे अशी आयोगाची संकल्पना आहे. पुढे बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, संपूर्ण गावात असे ठराव शासकीय पातळीवर झाल्यास जनसामान्यांची वागणूक देत त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही अशा प्रयत्नांमधून बदलेल म्हणून आयोगाने अशी संकल्पना मांडली आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विशेष ग्रामसभा आयोजित केल्याबद्दल रूपाली चाकणकर यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे आभार मानले आहेत. तसेच राज्यात पहिल्यांदाच महिलांच्या विषयांकरिता विशेष ग्रामसभा घेण्याचा निर्णय झाल्याने महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा मैलाचा दगड असल्याचेही चाकणकर म्हणाल्या. केंद्र शासनाच्या पंचायती राज विभागाच्या अप्पर सचिवांनी देशातील सर्व राज्यातील ग्रामविकास सचिवांना दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजीच्या पत्रान्वये जागतिक महिला दिनानिमित्त महिला सभा आयोजित करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार शासनाकडून कार्यवाही करण्यात आली आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment