घरच्या नोकराकडे 4 हजार कोटींची प्रॉपर्टी:पण बायकोला देण्यासाठी 2 लाख रुपये नाहीत, करुणा शर्मांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

धनंजय मुंडे यांच्या घरच्या नोकराकडे 4 हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. पण स्वतःच्या बायकोला देण्यासाठी त्यांच्याकडे 2 लाख रुपये नाहीत, अशी खोचक टीका करुणा शर्मा मुंडे यांनी शुक्रवारी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधताना केली. वांद्रे स्थित दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यात त्यांनी आपले करुणा शर्मा यांच्याशी लग्न केव्हाच झाले नव्हते असा पुनरुच्चार केला आहे. त्यावर करुणा मुंडे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. घरच्या नोकराकडे 4 हजार कोटींची प्रॉपर्टी करुणा शर्मा म्हणाल्या, न्यायालयाने मला पहिली बायको म्हणून मला पोटगी देण्याचे आदेश दिले. पण माझा नवरा धनंजय मुंडे आम्हाला 2 लाख रुपये देण्यास तयार नाही. त्यासाठी त्यांनी याचिका दाखल केली. त्यावर आज सुनावणी आहे. धनंजय मुंडे यांच्या घरच्या नोकराकडे 4-4 हजार कोटींची प्रॉपर्टी आहे. पण स्वतःच्या बायकोला देण्यासाठी 2 लाख रुपये नाहीत. त्यांनी 27 वर्षे आम्हाला लपवून ठेवले. मला शंभर टक्के न्याय मिळेल. मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. न्यायालय पुराव्यांवर चालते. सर्व मंत्री आपल्या नोकरांच्या नावाने प्रॉपर्टी करतात. त्यांना कुठे अडकायचे नसतात. मी त्यांची बायको आहे. पण त्यांनी माझ्या नावाने काहीही केले नाही. मी 100 टक्के त्यांची बायको आहे, असे त्या म्हणाल्या. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्याकडे शेकडो कोटींची मालमत्ता आढळली आहे. या अनुषंगाने करुणा शर्मा बोलत होत्या. वाल्मीक कराड सध्या सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी अटकेत आहेत. धनंजय मुंडेंच्या याचिकेवरील सुनावणी 29 मार्चपर्यंत स्थगित दुसरीकडे, धनंजय मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी माझगाव सत्र न्यायालयाने 29 मार्चपर्यंत लांबणीवर टाकली आहे. आजच्या सुनावणीत करुणा शर्मा यांनी आपले उत्तर दाखल करण्यासाठी वेळ वाढवून मागितला. त्यानुसार कोर्टाने त्यांना 29 मार्च रोजी आपले उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. दिशा सालियनसह पूजा चव्हाणलाही न्याय मिळावा करुणा शर्मा यांनी यावेळी दिशा सालियनच्या मुद्यावरही भाष्य केले. त्या म्हणाल्या, दिशा सालियनला न्याय मिळाला पाहिजे. पण त्याचवेळी पूजा चव्हाणलाही न्याय मिळाला पाहिजे. पूजा चव्हाणचे सर्व पुरावे मीडियाकडे आहेत. तिचा पण मर्डर करण्यात आला. तिला मारण्यात आले, त्यावेळी ती प्रेग्नेंट होती. त्यावेळी संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला होता. पण हा मुद्दा शांत झाल्यानंतर त्यांना पुन्हा आता मंत्रिपद बहाल करण्यात आले. सत्तेचा गैरवापर करणारे लोक आता सत्तेत आहेत.