मतदान केंद्रांवर सर्व सुविधा पुरवा:पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्या!

मतदान केंद्रांवर सर्व सुविधा पुरवा:पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्या!

विधानसभा निवडणूक प्रक्रिया राबवताना त्यात कोणत्याही शंकेला वाव असता कामा नये, याची खबरदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी व निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त हिर्देशकुमार यांनी बुधवारी निवडणूक यंत्रणांना दिले. मतदान केंद्रांवर सुविधा पुरवण्याचाही आदेश दिला. बैठकीला अकोला येथून निवडणूक सामान्य निरीक्षक उदयन मिश्रा, गिरीशा पी. एस., नरहरीसिंग बांगेर, पोलीस निरीक्षक अजित सिंह, खर्च निरीक्षक निशांत के., सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच निवडणूक विभागाचे अधिकारी दुरदृष्यप्रणालीद्वार े उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांमधील निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी यांनाच सर्व प्रक्रिया राबवावयाची आहे. राबवत असलेल्या निवडणूक विषयक कामकाजाबाबत प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्ष, उमेदवार यांच्या प्रतिनिधींना माहिती द्यावी व प्रक्रिया राबवावी. त्याचे दस्तऐवजीकरण करावे. त्यांचे शंकानिरसन करावे. निवडणूक प्रक्रिया राबवताना पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे,असे निर्देश उपनिवडणूक आयुक्तांनी दिले. मतदान केंद्रांवर सर्व सुविधा पुरवा : मतदार याद्यांबाबतही योग्य ती काळजी घेऊन त्या याद्या अधिक बिनचूक असाव्यात, असे निर्देश उपनिवडणूक आयुक्तांनी दिले. प्रत्येक मतदारापर्यंत मतदान चिठ्ठ्या वेळेत पोहोचतील याचे नियोजन करा. विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करणे जसे. पर्यावरणपूरक, महिलांनी, दिव्यांग कर्मचाऱ्यांनी संचालित केलेले इ, मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, रॅम्प, सावली इ. सुविधांची निर्मिती, तसेच वेब कॅमेरे व सीसीटीव्ही कॅमेरे लावून मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करणे, मतदान केंद्राच्या बाहेर व आत कॅमेरे लावावे इ. सुचना दिल्या. मोबाईल फोनला बंदीच यंदा मतदान हे नोव्हेंबर महिन्यात असून आता सूर्यास्त लवकर होईल, अशा वेळी सायंकाळी मतदान केंद्रांवर पुरेशा प्रकाशासाठी दिवे लावण्याची सुविधा करावी, अशी सूचना देण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत मतदान केंद्रात मोबाईल नेता येणार नाही, याची दक्षता घ्या, असेही यावेळी सांगण्यात आले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment