राज्यपालांच्या बंगल्यासाठी 48 एकर जागा कशाला?:त्यांच्या निवसस्थानाची जागा शिवस्मारकासाठी द्या, उदयनराजे भोसलेंची मागणी

उदयनराजे भोसले यांनी सातारा येथे पत्रकार परिषद घेत विविध मुद्दे मांडले. यावेळी बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरकावरही भाष्य केले आहे. राज्यपालांच्या निवसस्थानासाठी 48 एकर जागा ठेवली आहे, ती कशाला पाहिजे? राज्यपालांच्या निवासस्थानाची जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकासाठी द्या, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे. तसेच याबाबतची मागणी राज्य आणि केंद्राकडे केली असल्याची माहिती देखील उदयनराजे भोसले यांनी केली आहे. उदयनराजे भोसले म्हणाले, 48 एकर म्हणजे किती जागा झाली. त्यांना आठ एकर जागा पण खूप झाली. अरबी समुद्रात पुतळा बांधला तरी अनेक अडचणी निर्माण होतील. त्याच्या बाजूला 48 एकर आहे. महापौरांच्या बंगल्याचे स्मारक झालेच ना. राज्यपालांना दुसरीकडे जागा बांधून द्या. कारण त्याच्यासारखा दुसरा स्पॉट नाही, असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांच्या बंगल्यासाठी 48 एकर जागा कशाला, ती जागा शिवस्मारकाला द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. पुढे बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांचा अवमान होऊ नये, यासाठी कायदा या आधीच काँग्रेस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात व्हायला हवा होता. शिवसेनेच्या नावातच शिवाजी महाराजांचे शिव आहे. पण त्यांनीही केले नाही. आता कायदा होत आहे. ते काम माझ्याकडून होत आहे. हे माझ्या आयुष्यातील मोठे काम आहे. दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनेक मागण्या केल्या आहेत. त्यात राजधानी दिल्लीत देखील बुद्ध सर्किट जसे आहे तसे छत्रपती शिवाजी महाराज सर्किट व्हावे, अशी मागणी अमित शहा यांच्याकडे केली होती. तसेच दिल्लीत शिवाजी महाराजांचे स्मारकही व्हावे, अशीही मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे.