गृहयुद्धाच्या ठेकेदारांनी देशाला वेठीस धरले:काश्मीरातील हिंदूंचे हत्याकांड त्याच गृहयुद्धाचा भाग, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

गृहयुद्धाच्या ठेकेदारांनी देशाला वेठीस धरले:काश्मीरातील हिंदूंचे हत्याकांड त्याच गृहयुद्धाचा भाग, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

काश्मीरच्या हत्याकांडाचेही आता राजकारण होईल. जसे ते पुलवामा हत्याकांडात झाले. हिंदूंच्या हत्या जेवढ्या होतील तेवढी मुसलमानांविरुद्ध आग ओकता येईल व अंधभक्तांना गृहयुद्धात ढकलता येईल, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, भारतात गृहयुद्ध सुरू झाल्याची बोंब भाजपमधील अनेक दुब्यांनी मारली आहे. हिंदू-मुसलमानांचे झगडे लावून रक्तपातास आमंत्रण देणारे हे लोक गृहयुद्धाचे ठेकेदार आहेत. काश्मीरातील हिंदूंचे हत्याकांड त्याच गृहयुद्धाचा भाग आहे. गृहयुद्ध जास्तच भडकले तर ‘राजा’आणि राष्ट्रप्रमुखाला पळून जावे लागते हे भाजपच्या दुब्यांना समजायला हवे! नेमके राऊत काय म्हणाले? संजय राऊत म्हणाले की, काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी हल्ला केला. त्यात 26 पर्यटक प्राणास मुकले. हे बहुतेक पर्यटक हिंदू होते. मोदी व त्यांचे लोक देशात द्वेषाचे विष पेरत आहेत. त्यातून पहलगाम हत्याकांड घडले. कारण बंदूकधाऱ्यांनी पुरुष पर्यटकांना गोळ्या घातल्यावर आक्रोश करणाऱ्या महिलांना सांगितले, जाऊन सांगा तुमच्या मोदींना. याचा अर्थ काय? अर्थ सरळ आहे. धार्मिक गृहयुद्धाची ही ठिणगी पडताना दिसत आहे व हे गेल्या दहा वर्षांत राज्य करणाऱ्या मोदी सरकारचे अपयश आहे. मणिपूरच्या आगीमागे भाजपचे राजकारण संजय राऊत म्हणाले की, काश्मीरात गृहयुद्धाच्या फैरी झडण्याआधी भाजपचे बडबोले खासदार निशिकांत दुबे यांनी गृहयुद्ध सुरू झाल्याची बोंब मारली व त्या गृहयुद्धाचे खापर दुबे यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश संजीव खन्नांवर फोडले. मणिपूरसारख्या राज्यात गेल्या तीन वर्षांपासून जो आतंक, अराजक, वर्गकलह रस्त्यांवर सुरू आहे, तो गृहयुद्धाचाच भाग आहे. त्यामागे मुसलमान नाहीत आणि सुप्रीम कोर्टही नाही. असलेच तर भाजपचे राजकारण त्यामागे आहे.पंतप्रधान मोदी हे ईश्वराचे अवतार आहेत व दुब्यांसारखे लोक त्या अवताराची पिल्ले आहेत. तरीही काश्मीरपासून मणिपूरपर्यंत गृहयुद्धाच्या ठिणग्या का उडत आहेत? गोमूत्रामुळे मोदी-शहा फडणवीसांना नशा येते संजय राऊत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना निर्देश दिले व विधेयकांवर कालमर्यादेत निर्णय घेणे बंधनकारक असल्याचे सांगितले. सरन्यायाधीशांनी हा निकाल देताच भाजपच्या दुब्यांनी राष्ट्रपतींना निर्देश देणारे सुप्रीम कोर्ट कोण? सुप्रीम कोर्ट आपल्या मर्यादांचे उल्लंघन करीत आहे. सुप्रीम कोर्टाने पार्लमेंटचे अधिकार आपल्याकडे घेतले. हे गृहयुद्ध आहे. या गृहयुद्धास सरन्यायाधीश संजीव खन्ना जबाबदार आहेत. असे अकलेचे तारे तोडले. देशाच्या सरन्यायाधीशांवर चिखलफेक करणे हे दबावाचे राजकारण आहे. सरकारी बॉसने निर्देश दिल्याशिवाय दुबेंसारखे लोक सरन्यायाधीशांवर गृहयुद्धाचे खापर फोडणार नाहीत. दुबे यांची आतापर्यंतची सर्वच वक्तव्यं ही धर्मांधतेला (गृहयुद्धाला) उत्तेजन देणारी व समाजात द्वेषाची आग भडकवणारी आहेत. सध्याच्या भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा (विकृत) अनुभवायचा असेल तर तो दिल्लीत निशिकांत दुबे आणि महाराष्ट्रात नितेश राणे हाच आहे. नितेश राणे यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारला, सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. कोणते सरबत आपण पसंत करता? रुह अफजा की गुलाब शरबत? महाराष्ट्राचे सन्माननीय मंत्री नीतेश राणे यांनी सांगितले, मी उन्हाळ्यातून थंडाई मिळवण्यासाठी गोमूत्र पितो. फार मजा येते. शरीर स्वस्थ राहते. याचा अर्थ मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस वगैरे हिंदुत्ववादी लोक सध्या याच थंड पेयाचे प्राशन करीत असावेत. याच पेयामुळे नशा येते व सरन्यायाधीशांवर अराजक माजवण्याचे आरोप केले गेले. पाणीटंचाईने हाहाकार माजवला हे गृहयुद्ध संजय राऊत म्हणाले की, भाजपचे दुबे म्हणतात, ‘देशात गृहयुद्ध सुरू झाले. एक नाही, अनेक गृहयुद्धं एकाच वेळी भडकली आहेत. त्यास सरन्यायाधीश खन्ना जबाबदार आहेत.’ खरे तर देशातील वीस राज्यांत भाजपची सरकारे आहेत. देशाचे संपूर्ण प्रशासन, सैन्य, पोलीस दलावर भाजप आणि मोदींचे नियंत्रण आहे. मग जर गृहयुद्ध सुरू झाले असेल तर ते केंद्र सरकारचे अपयश आहे व गृहयुद्धाची जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान मोदी यांनी राजीनामाच दिला पाहिजे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना खुर्चीवर राहण्याचा अजिबात अधिकार नाही. काश्मीरातील कालच्या हिंदू हत्याकांडानंतर तर अमित शहांना खुर्चीवर बसण्याचा अधिकारच उरत नाही. निशिकांत दुबे हे ज्या गृहयुद्धाची बात करतात ते खरे असेल तर ते कोणामुळे सुरू झालं? आधीच्या सरन्यायाधीशांनी मशिदी, मदरसे, दर्गे यांच्या खोदकामाची सरसकट परवानगी दिली. खोदकाम करून मंदिरांचा शोध घेण्याची परवानगी हे गृहयुद्धाला आमंत्रण आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील संभलसह अनेक ठिकाणी दंगली झाल्या. देशात महागाई, बेरोजगारीने हाहाकार माजवला आहे. सोने लाखाच्या वर गेले. महाराष्ट्रात पाणीटंचाईने हाहाकार माजवला आहे. मुंबईसारख्या शहरात पाण्यासाठी मोर्चे निघत आहेत. हे एक प्रकारचे गृहयुद्धच आहे, पण दुबेंसारखे लोक गृहयुद्ध म्हणजे हिंदू-मुसलमानांचे दंगे होणे असाच अर्थ घेतात. सर्वोच्च न्यायालय सत्ताधाऱ्यांचा दबाव न जुमानता राष्ट्रपतींना निर्देश देते. दुबेंना वाटते ही गृहयुद्धाची सुरुवात आहे, परंतु तसे नसून राष्ट्रपतींचे रबरी शिक्के करून राष्ट्रपती भवनात बसवणे हीच खरी गृहयुद्धाची सुरुवात म्हणावी लागेल. दोन तासांत 65 लाख मतदान कसे शक्य संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी अमेरिकेत गेले व महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कसा ‘महा फर्जीवाडा’ झाला ते जगासमोर आणले. भारताचा निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षात हातमिळवणी झाली. त्यामुळे देशातील निवडणुका पारदर्शक, निष्पक्ष झाल्या नाहीत. राहुल गांधींचा हा दावा महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत फक्त दोन तासांत नव्या 65 लाख मतदारांनी मतदान केले. अनेक ठिकाणी मतदार संख्येपेक्षा जास्त मतदारांनी मतदान केले. निवडणूक आयोगाने संध्याकाळी 5.30 वाजता एक आकडा दिला आणि 7.30 वाजता 65 लाख मतदार वाढल्याचे दिसले. हे कसे शक्य आहे? लोकशाहीतले हे अराजक आहे. हे अराजक सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी निर्माण केले नाही, तर मोदी-शहा-फडणवीस यांच्या व्यापारी राजकारणातून ते निर्माण झाले. निशिकांत दुबे यांच्यासारख्या लोकांना ते माहीत असण्याचे कारण नाही. कारण त्यांचा गुन्हेगारी इतिहास धक्कादायक आहे. फसवणूक, धमक्या, फर्जीवाडे अशा गुन्ह्यांच्या पदव्यांनी ते सुशोभित आहेत. भाजपकृपेने ते खासदार झाले व गुन्हे दाबले गेले. राष्ट्रप्रमुख स्वार्थी असेल तर गृहयुद्धाचा धोका संजय राऊत म्हणाले की, जगात अनेक ठिकाणी गृहयुद्ध सुरू आहे, ते का? याचा अभ्यास भाजपच्या सर्व दुब्यांनी केला पाहिजे. सीरिया, सुदान, म्यानमार, अफगाणिस्तानसारखे देश गृहयुद्धात उद्ध्वस्त झाले. भूक, बेकारी, वर्ग-वर्णकलहातून गृहयुद्धाचा वणवा पेटला. लोकशाही वाचवण्यासाठी आणि गुलामीविरुद्धसुद्धा गृहयुद्धाचे बंड उफाळून येते. 1860 साली अमेरिकेत गृहयुद्ध पेटले होते. गृहयुद्ध म्हणजे देशांतर्गत युद्ध, देशाचे नागरिक एकमेकांविरुद्ध जात आणि धर्माच्या नावावर लढतात व रक्ताचे पाट वाहतात. त्यात राज्ये कोसळून पडतात. एखाद्या देशाचा ‘राजा’ आणि राष्ट्रप्रमुख हा स्वार्थी असेल तर गृहयुद्धाचा धोका असतो. राष्ट्रप्रमुख हा राज्य टिकवण्यासाठी हुकूमशहा बनतो तेव्हा लोकांचा संयम सुटतो व लोक रस्त्यावर उतरून राज्य ताब्यात घेतात. अशा वेळी राजाला किंवा राष्ट्रप्रमुखाला पळून जावे लागते. बाजूच्या बांगलादेश, पाकिस्तानात हे नेहमी घडते. भारतात हेच घडेल अशी भीती भाजपच्या दुब्यांना वाटते काय? काश्मीरच्या हत्याकांडाचेही आता राजकारण होईल. जसे ते पुलवामा हत्याकांडात झाले. हिंदूंच्या हत्या जेवढ्या होतील तेवढी मुसलमानांविरुद्ध आग ओकता येईल व अंधभक्तांना गृहयुद्धात ढकलता येईल. भारतात यापेक्षा वेगळे काय सुरू आहे? गृहयुद्धाच्या ठेकेदारांनी देशाला वेठीस धरले आहे. तूर्त इतकेच!

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment