गुढीपाडव्यानिमित्त पुण्यात अनोखी पहल:पाच हजार महिला नऊवारी साडीत दुचाकीवर निघणार, घेणार पाणी बचतीचा संकल्प

जनसेवा न्यास, हडपसरतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्यानिमित्त रविवार, दि. 30 मार्च रोजी हिंदू महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी नववर्षाच्या स्वागताबरोबरच यंदा अमनोरा येस्स फांउडेशनच्या सहकार्याने 100 कोटी लिटर पाणी बचतीचा संकल्प केला जाणार आहे. हिंदू महिला महोत्सवानिमित्त महिलांची दुचाकी रॅली काढली जाणार असून रॅलीच्या सांगतास्थळी महिला पाणी बचतीची शपथ घेणार आहेत, अशी माहिती अमनोरा येस्स फाउंडेशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, जनसेवा न्यासाचे कार्यकारी विश्वस्त माधव राऊत आणि सी. ई. ओ. चेतन कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. अमनोरा येस्स फाउंडेशनचे विवेक कुलकर्णी उपस्थित होते. आदर्श समाज निर्मितीसाठी अव्याहतपणे कार्यरत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षात पदार्पण केले आहे. समाजहिताच्या दृष्टीने संघाने काही ध्येय आणि उद्दिष्टे निश्चित केली आहेत. याच विचाराने जनसेवा न्यास, हडपसर तर्फे मराठी नववर्षाचे स्वागत करतानाच समाज हिताच्या दृष्टीने पाणी बचतीचा संकल्प केला जाणार आहे. रॅलीच्या माध्यमातून पाणी बचतीसाठी जनजागृती केली जाणार आहे. हडपसर आणि परिसरातील महिलांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. रॅलीत सहभागी महिलांना सन्मानपत्र तसेच पाणी बचती संदर्भातील बँड दिला जाणार आहे. पाणी बचती संदर्भात जनजागृती करणाऱ्या महिलांना ‘जलज्योती’ असे संबोधण्यात येणार आहे. हडपसर परिसरातील माळवाडी, वैदुवाडी, रामटेकडी, ससाणे नगर, गोंधळे नगर/सातववाडी, फुरसुंगी/भेकराई नगर, बी. टी. कवडे रोड, मगरपट्टा, अमनोरा, शेवाळवाडी, मुंढवा/मांजरी, कुमार पिकासो, उंड्री/पिसोळी, व्हिनस वर्ल्ड स्कूल, अमरसृष्टी तसेच अमनोरामधील महिलांची अस्पायर टॉवर्स आणि अवंतिकांची मेट्रो टॉवर्स समोरून तसेच एकूण 17 ठिकाणांहून दि. 30 रोजी सायंकाळी 5 वाजता महिलांच्या दुचाकी रॅलीला सुरुवात होणार आहे. नऊवारी साडी या पारंपरिक वेशभूषेत महिला मराठमोळा फेटा बांधून रॅलीत सहभागी होणार आहेत. रॅलीत सहभागी होण्यासाठी नावनोंदणीला सुरुवात झाली असून आतापर्यंत 4200 महिलांची नोंदणी झाली आहे. रॅलीत पाच हजार महिलांचा सहभाग असणार आहे. दुचाकी रॅलीची सांगता सायंकाळी 6 वाजता अमनोरा क्रिकेट ग्राउंड, एड्रिनो टॉवर समोर, अमनोरा, हडपसर येथे होणार आहे. ढोल-ताशा पथकाचे वादन झाल्यानंतर महिला पाणी बचतीची शपथ घेणार आहेत. अमनोरामध्ये पाणी बचतीला महिलांच्या पुढाकारातून सुरुवात झाली आहे. अमनोरात घरकाम करणाऱ्या महिलांना; ज्यांना अवंतिका संबोधले जाते त्यांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून देण्यात आले असून त्याही गेल्या काही वर्षांपासून पाण्याचा काळजीपूर्वक वापर करीत आहेत. या अवंतिकांचाही दुचाकी रॅलीत सहभाग असणार आहे.