लक्ष्मण हाके – अमोल मिटकरींमध्ये जुंपली:‘वायझेड’वरून सुरु झाले घमासान, एकमेकांवर लायकीपासून कुत्र्यापर्यंत टोकाची टीका

लक्ष्मण हाके – अमोल मिटकरींमध्ये जुंपली:‘वायझेड’वरून सुरु झाले घमासान, एकमेकांवर लायकीपासून कुत्र्यापर्यंत टोकाची टीका

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यात ‘वायझेड’वरून चांगलाच वाद चिघळला असून विकोपाला पोहोचला आहे. लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या जोरदार टीकेनंतर, मिटकरी यांनी देखील हाकेंवर अत्यंत टोकाची, वैयक्तिक टीका करत त्यांना ‘भुंकणारा कुत्रा’म्हटले आहे. मिटकरी यांनी हाकेंना वायझेड म्हणत त्यांची औकातही काढली. तर दुसरीकडे जोपर्यंत मिटकरी माझ्यावर टीका करत राहणार तोपर्यंत मी अजित पवारांना आणखी प्रश्न विचारत राहणार, असा पवित्रा लक्ष्मण हाके यांनी घेतला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना विचारले होते की, “अजित पवार यांना ओबीसींसाठी निधी वाटताना हाताला लकवा का येतो?” तसेच, ते नेहमीच भाजपचे नेते अमित शाह यांच्या इशाऱ्यावरच काम करत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. या टीकेनंतर लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच जुंपली आहे. अमोल मिटकरी नेमके काय म्हणाले होते? लक्ष्मण हाके हा भुंकणारा कुत्रा आहे. त्यांना जास्त किंमत दिली नाही पाहिजे, असा घणाघात अमोल मिटकरी यांनी केला. ते महादेव जाणकर यांचे उपकार विसरले आहेत. त्यांच्यासोबत राहून हाके यांनी जानकर यांना दगा दिला, असा आरोपही मिटकरी यांनी हाकेंवर केला. ते काय ओबीसी समाजाबद्दल बोलत आहे. सरकारने ओबीसी समाजासाठी किती काम केले आहे, याची त्यांना कल्पना नाही. त्यांची लायकी नाही, अशी टोकाची टीकाही मिटकरी यांनी हाकेंवर केली. हाकेंची अजित पवारांवर बोलण्याची लायकी नाही तसेच, लक्ष्मण हाके यांनी औकातीत रहावे. त्यांच्यात दम असेल तर त्यांनी फक्त माझ्या शर्टच्या बटणाला हात लावून दाखवावा, असे आव्हानही मिटकरी यांनी हाकेंना दिले आहे. त्यांना मराठी भाषा समजत नाहीये. वाय झेड नावाचा एक सिनेमा आहे आणि हा सिनेमा जाऊन पहावा, असा खोचक सल्ला मिटकरी यांनी हाके यांना दिला होता. नांदेडमधील भोकर मतदारसंघात हाके यांनी प्रहार संघटनेच्या उमेदवारासोबत काय केले हे सर्वांना माहिती आहे. यासंदर्भात त्यांनी उत्तर देणे टाळले आहे. हाके हे राज्य मागास आयोगाचे सदस्य कसे असू शकतात. हाके हे जातीयवादी आहेत, असा आरोपही अमोल मिटकरी यांनी केला. हाके यांना राज्य मागास आयोगावर कोणी घेतले? हाके यांची पात्रता होती का? असा सवाल करत आगामी अधिवेशनात मी हा मुद्दा मांडणार असल्याचे मिटकरी म्हणाले. अजित पवार यांच्यावर बोलण्याची त्यांची लायकी नाही. हाके यांनी आपल्या लायकीत राहावे, असेही ते म्हणाले. हाकेंचा मिटकरींच्या टीकेवर जोरदार पलटवार लक्ष्मण हाके यांनी देखील अमोल मिटकीर यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जोपर्यंत मिटकरी वायझेड शब्दाचा अर्थ सांगणार नाहीत, तोपर्यंत मी अजित पवार यांचे कपडे फाडायचे सोडणार नाही, असा इशारा हाके यांनी दिला. मी ओबीसींचे प्रश्न विचारतोय. अजित पवार यांनी यांच्या आमदाराला कमरेखालच्या शिव्या द्यायला ठेवले. अमोल मिटकरी जेवढी माझ्यावर टीका करतील तेवढे मी अजित पवारांना जास्त प्रश्न विचारणार आहे, असेही हाके म्हणाले. तसेच मी लोकांचे प्रश्न मांडतोय आणि हे इकडे माझ्यावर खालची टीका करत आहेत. मिटकरी बोलतात वेगळे आणि दाखवतात वेगळे. ते विरोधाभास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मिटकरी हे अशा पक्षाचे प्रवक्ते आहेत ज्या पक्षाचे मालक नेहमी सत्तेत बसायचा प्रयत्न करतात. महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर खाली चाललाय. अजित पवार यांना हे समजायला हवे. मिटकरी यांना अजित पवारांचा पाठिंबा आहे, असा आरोपही लक्ष्मण हाके यांनी केला. मला दोन शिव्या दिल्या, तर 10 प्रश्न विचारणार तसेच, माझे जुने फोटो मॉर्फ करुन दाखवले जात आहेत. आम्ही गावाकडची लोक आहोत. आमची सुरुवात शिव्यांनीच होते. अमोल मिटकरी यांनी दोन शिव्या दिल्या तर मी अजित पवार यांना दहा प्रश्न विचारणार आहे. माझा लढा अजित पवार या वैयक्तिक माणसाबरोबर नाही माझा लढा प्रवृत्तीविरोधात आहे. अमोल मिटकरी यांना अजित पवार यांनी संधी दिली आहे. त्यांनी संविधानिक मार्गाने बोलले पाहिजे, असेही लक्ष्मण हाके म्हणालेत.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment