आधी हगवणे कुटुंबाच्या बैलासमोर डान्स, आता गौतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया:म्हणाली – ‘हुंडा देणे-घेणे, अत्याचार सहन करणे हे चुकीचेच’

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात अनेक बाबी आता समोर आल्या आहेत. वैष्णवी यांनी कुटुंबाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. हगवणे कुटुंब मोठा बडेजाव करण्यात माहिर असल्याची अनेक उदाहरणे या आधी देखील समोर आली होती. त्यात त्यांच्या बैलांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध नृत्य कलाकार गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. आता या प्रकरणावर गौतमी पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात बोलताना गौतमी पाटील म्हणाली की, वैष्णवी हगवणे यांच्याबरोबर जे झाले ते चुकीचेच आहे. महिलांवर आणि मुलींवर अत्याचार होत असतील तर त्याला त्यांनी लगेच आई-वडिलांना सांगायला हवे. अत्याचार सहन करणे हे चुकीचे आहे. हुंडा देणे, पैसे देणे, गाड्या देणे, हे चुकीचेच आहे. मुलगी ज्या घरी दिली जाते, ती त्या घरची लक्ष्मी असते. हुंडा देणे हे चुकीचे आहे. मी त्याचा तीव्र शब्दात विरोध करते, असे देखील गौतमी पाटीलने म्हटले आहे. या संदर्भात बोलताना गौतमी पाटील म्हणाली की, बैल जोडी समोर मी नाचले होते. मात्र, मी कार्यक्रमाला बोलावण्यात आले त्याप्रमाणे कार्यक्रमाला गेले होते. कोण आयोजक आहेत, ते मी फारसे बघत नाही. मी फक्त जाऊन स्टेजवर परफॉर्मन्स करते आणि तिथून निघून जाते. बाकीच्या गोष्टीशी माझे देणे घेणे नसते, असे देखील गौतमी पाटीलने म्हटले आहे. नेमके प्रकरण काय? वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हगवणे कुटुंबीयांचे अनेक कारनामे उजेडात येत आहेत. वैष्णवीचा दीर सुशील हगवणे याने 2 वर्षांपूर्वी आपल्या बैलाच्या वाढदिवसानिमित्त चक्क गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. यासंबंधीच्या माहितीनुसार, 2023 मध्ये नृत्यांगणा गौतमी पाटील एका बावऱ्या नामक बैलापुढे नाचल्याची बातमी व व्हिडिओ व्हायरल झाला होता. नंतर हा कार्यक्रम मुळशीच्या सुशील हगवणे यांनी आयोजित केल्याचे स्पष्ट झाले होते. या व्हिडिओत स्टेजपुढे एक बैल बांधल्याचे दिसून येत होते. तर त्याच्यापुढे असणाऱ्या स्टेजवर गौतमी नाचताना दिसून येत होती. तिच्यामागे सुशील हगवणे याचा मोठा फोटो व नावही दिसून येत होते. आत्ता वैष्णवी हगवणे यांच्या हुंडाबळीमुळे हा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. त्यांची ही पैशांसाठी उधळपट्टी पाहून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्यावर गौतमी पाटीलने प्रतिक्रिया दिली आहे.