आधी पाठीत खंजीर खुपसला, आता भेटायची हिंमत कशी झाली?:ते तर निर्ढावलेले लोक; संजय राऊत यांची अजित पवारांवर बोचरी टीका

अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत अजित पवारांवर बोचरी टीका केली. हे निर्ढावलेले लोक असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. आम्ही जर असे काम केले असते, तर आमची भेट घेण्याची हिंमतच झाली नसती. माझ्यासारख्या माणसाने जर वडीलधाऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला असता तर डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नसती, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी आम्ही काही चूक केली असती तर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात डोळे घालण्याची आमची हिंमत झाली नसती आणि लाज देखील वाटली असती. हे माझे वैयक्तिक मत आणि आमच्या पक्षाची भावना असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. इतक्या महान माणसाच्या विरोधात आपण प्रचार केला. त्यांच्यावर चिखल फेक केली आणि परत शुभेच्छा द्यायला येतात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हे महाराष्ट्राला किती आवडेल? सांगता येत नाही. मात्र मी नजरेला नजर देऊ शकलो नसतो, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांच्यासोबत खासदार सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील पटकरे, छगन‎ भुजबळ, पार्थ पवार हे देखील उपस्थित होते. यावरुन संजय राऊत यांनी अजित पवारावंर जोरदार टीका केली. अजित पवारांना महाराष्ट्रात काय सुरु हे माहिती आहे का? अजित पवार यांना महाराष्ट्रात काय सुरु आहे हे माहिती आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रामध्ये रोज खून होत आहेत, दंगली होत आहेत, आणि इथे बसून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार नाकाने कांदे सोलत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 20 तारखेला महाराष्ट्रातील निवडणुकीला एक महिना होत आहे. तरी देखील अद्याप राज्यात मंत्रिमंडळ स्थापन झालेले नाही. राज्यात होत हत्या होताहेत, याची फडणवीसांना लाच वाटत नाही का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सुनेत्रा पवारांना घर, ही अजित पवारांची सोय आम्ही राज्यसभेत पहिल्यांदा आलो होतो, त्यावेळी आम्हाला साध्या घरात जागा देण्यात आली होती. मात्र आता सुनेत्रा पवार यांना जनपथवर चांगले घर देण्यात आले आहे. हे कशासाठी? ही अजित पवार यांची सोय करण्यासाठी केले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. दिल्ली ही कारस्थान्यांची राजधानी आहे. आणि सुनेत्रा पवार यांना दिलेले घर म्हणजे मोदी सरकारचे कट कारस्थान असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. शिवसेना- काँग्रेस खासदारांच्या शुभेच्छा शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. ते महाराष्ट्राचे आधारवड आहेत. देशाच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान हे अतुलनीय असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. आम्हाला अनेक वर्षे त्यांचे मार्गदर्शन मिळालेले आहे. त्यामुळे त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो लाभावे ही आमची सर्वांची प्रार्थना असते. नेहमी त्यांचा वाढदिवस महाराष्ट्रातील बारामतीत साजरा होतो. मात्र यावेळी अधिवेशन असल्यामुळे ते दिल्लीत थांबले आहेत. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसच्या सर्वच खासदारांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

  

Share