कट्टर विरोधकांनी घेतली गळाभेट:नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल एकाच मंचावर, राजकीय वर्तुळात चर्चा
भंडारा जिल्ह्यातील पिंपळगाव येथे शंकरपट शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात राजकीय कट्टर विरोधक नेते एकाच मंचावर पाहायला मिळाले. कॉंग्रेस नेते नाना पटोले आणि अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल या दोघांनी गळाभेट देखील घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात तसेच यातील येणारे सातही विधानसभा मतदारसंघात आपलेच वर्चस्व ठेवण्याचे प्रयत्न या दोन्ही नेत्यांकडून केले जातात. राजकीय व्यसपीठांवरून एकमेकांवर आरोप टीका करणारे प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले हे यावेळी एकाच मंचावर उपस्थित होते तसेच या दोघांमध्ये गप्पा देखील झाल्याचे पाहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये बोलताना अनेकवेळा महाविकास आघाडीच सत्तेत येणार आणि मुख्यमंत्री पदावर नाना पटोले यांनी दावा देखील केला होता. आमगाव येथे भाषणात बोलताना नाना पटोले म्हणाले होते, राजकुमार पुराम याला आमदार बनवायचे आहे. नाही बनवलं तुम्ही तर महाराष्ट्रात नानाभाऊ उद्या काय बनणार आहे हे तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही एक एक आमदार नाही दिले तर अडचण येणार आहे, असे म्हणत नाना पटोले यांनी मुख्यमंत्रिपदासाठी अप्रत्यक्ष होकार दिल्याचे दिसून आले होते. नाना पटोले यांच्या या विधानवार प्रफुल्ल पटेल यांनी जोरदार पलटवार केला होता. ते म्हणाले होते, नाना पटोले हे स्वयंभू घोषित मुख्यमंत्री आहेत. अशा म्हणण्याने कुणी काही बनत नाही. महाराष्ट्रामध्ये तुमचे सरकार आले पाहिजे. असा पलटवार प्रफुल्ल पटेल यांनी केला होता. असे हे दोन्ही नेते एकमेकांचे कट्टर विरोधक असून देखील आज एकाच मंचावर दिसून आले. यावेळ त्यांच्यात झालेली गळाभेट देखील सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.