हिंगोलीत शेतकऱ्याला मारहाण:जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल

हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या पारडा येथील शेतकऱ्यासह त्याच्या भावास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्यासह चौघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात सोमवारी तारीख 21 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील पारडा येथील शेतकरी चांदू वाघमारे व त्यांचा भाऊ हे दोघेजण तारीख 15 एप्रिल रोजी जिल्हा मध्यवर्ती बँकेत पैसे भरण्यासाठी गेले होते. यावेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. पैसे भरण्याची स्लिप भरण्यावरून चांदु वाघमारे व बँकेचा सेवक शेख मुनीर यांच्यात वादाला तोंड फुटले. शाब्दिक चकमकीनंतर शेख मुनीर यांनी चांदू वाघमारे यांच्या तोंडावर चापट मारली. यामुळे चांदू यांच्या तोंडाला दुखापत झाली. सदर भांडण सोडविण्यासाठी चांदु यांचा भाऊ मध्ये आला असता बँकेचे अधिकारी तसेच कर्मचारी शेख मुनीर, काळे, पवार यांनी त्यांना बँकेच्या बाहेर काढले. त्यानंतर या चौघांनी मिळून चांदू यांच्या भावाला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणी मध्ये त्यांच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली त्यानंतर त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चांदू वाघमारे यांनी आज रात्री हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली यावरून पोलिसांनी वरील चौघांवर जातीवाचक शिवीगाळ करणे तसेच मारहाण करण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपाधीक्षक सुरेश दळवे, पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, उपनिरीक्षक पी. एल. गंधकवाड, जमादार संजय मार्के, अशोक धामणे पुढील तपास करीत आहेत.