ऐतिहासिक हनुमान यात्रा:बारा गाड्या ओढण्याची आडगावात अनोखी परंपरा, पौष महिन्यातील पौर्णिमेला भरतो यात्रोत्सव
पौष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी आडगाव बुद्रुक गावात ऐतिहासिक हनुमान यात्रा भरते. अनेक वर्षांपासून चालू असलेली बारा गाड्या ओढण्याची परंपरा या गावात आजही कायम आहे. शहरातील झाल्टा फाटा जवळच आडगाव बु. गाव आहे. येथे बारागाड्या पाहण्यासाठी व दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक हजेरी लावतात. यंदा 13 जानेवारी रोजी साधारण एक किलोमीटर अंतरावरून ते हनुमान मंदिरापर्यंत बारा गाड्या ओढल्या गेल्या. बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हनुमानाचा जयघोष करत अनेक भाविक बारागाड्यावर रेवड्या उधळत होते. बारा गाड्या मंदिराजवळ आल्यानंतर भाविकांनी ढोलताशाच्या तालावर गाड्यांसमोर जल्लोष करत आनंद घेतला. मिरवणूक पाहण्यासाठी हजारो भाविक ऐतिहासिक हनुमान यात्रेला गावात हजारो भाविक हजेरी लावतात. बारागाड्या पाहण्यासाठी व दर्शनासाठी जवळपासचे सर्व गावकरी येतात. वर्षानुवर्षे चालत आलेला हा पिढी-परंपरागत उत्सवाची प्रथा पिढ्या जोपासत आहे. या ठिकाणी लहान-मोठे दुकानदार, प्रसाद विक्रेते यांनी आपली दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली होती. नेमकी काय आहे 12 गाड्या ओढण्याची परंपरा… जत्रेच्या दिवशी देवत्व प्राप्त झालेल्या नवरदेवाला ज्याप्रमाणे लग्नाच्या आधी हळद लावतात त्याच पद्धतीने तरुणाला हळद लावली जाते. संध्याकाळी साज चढवून मारुती मंदिरात दर्शनासाठी आणले जाते. त्या तरुणाच्या अंगात दैवी शक्ती संचारली, असा समज असतो. त्याच्या कमरेला किंवा डोक्याच्या शेंडींला दोरी बांधली जाते. बारा गाड्या जोडलेल्या असतात आणि त्या गाड्यात गावातील व परिसरातील लोक गर्दी करून बसलेले असतात. रस्त्याच्या दुतर्फा ग्रामस्थ ही मौज लुटण्यासाठी व दर्शनासाठी गर्दी करून करतात.