होम अप्लायन्सचा प्रकल्प:संभाजीनगरात निडेक कंपनी गुंतवणार 1002 कोटी रुपये; 1 हजार लोकांना रोजगार

होम अप्लायन्सचा प्रकल्प:संभाजीनगरात निडेक कंपनी गुंतवणार 1002 कोटी रुपये; 1 हजार लोकांना रोजगार

बिडकीन ऑरिक सिटीत जपानची निडेक ग्लोबल अप्लायन्स कंपनी १००२ कोटींची गुंतवणूक करून होम अप्लायन्सचा प्रकल्प उभारणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत याबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला. या कंपनीच्या माध्यमातून ७०० ते १००० जणांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिली. निडेक ग्लोबल होम अप्लायन्सेसची ९ देशांत गुंतवणूक आहे. कंपनीचे १५ हजारांपेक्षा अधिक कर्मचारी आहेत. रेफ्रीजरेटर, वॉशिंग मशीनच्या मोटर्स, ड्रायर यासह अनेक होम अप्लायन्सची निर्मिती या कंपनीकडून केली जाते. यापूर्वी व्हिडिओकॉन कंपनीच्या माध्यमातून होम अप्लायन्सची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत होती. त्यामुळे संभाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात या कंपन्यांचे व्हेंडर तयार होते. व्हिडिओकॉन बंद पडल्यामुळे यातील अनेक छोटे उद्योग संकटात आले होते. या नव्या कंपनीमुळे या लघुउद्योगांनादेखील फायदा होणार असल्याचे व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष अजय शहा यांनी सांगितले. एमजीएम ६०० कोटींतून उभारणार रुग्णालय एमजीएम संस्थेला ऑरिकमध्ये ३५ एकर जागा मिळाली आहे. संस्थेकडून ६०० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात ५० बेडच्या हॉस्पिटलची उभारणी केली जाईल. नंतर १०० बेड आणि नंतर १५० बेडचे हॉस्पिटल होईल. फिजिओथेरपी महाविद्यालय आणि नर्सिंग महाविद्यालय यासह इतर उपक्रम सुरू केले जातील, अशी माहिती एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम यांनी दिली. डीएमआयसीत वर्षभरात २० हजार कोटींची गुंतवणूक, २५ हजार रोजगार वर्षभरात ऑरिक सिटीत अजून २० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. यात प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या २५ हजार रोजगार निर्माण होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. आतापर्यंत बिडकीन आणि शेंद्रात ७७ हजार कोटींची गुंतवणूक झाली असल्याची माहिती ऑरिकचे व्यवस्थापक महेश पाटील यांनी दिली. टोयोटा, जेएसडब्ल्यू, एथर या कंपन्यांची गुंतवणूक वर्षभरात निश्चित झाली आहे. याशिवाय अवनी पॉवर यांनी १५८ एकर जागा मागितली आहे. त्यांची १०५२१ कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे, तर टोयोटा टुशो कॉर्पोरेशन टेक्नो पार्क बिझनेसने ७०० कोटींच्या प्रकल्पासाठी ७५ एकरची जागा मागितली आहे. नव्याने येणाऱ्या कंपन्यांना प्रशासन सर्व सुविधा देणार
आमची टोयोटा एथर यासह इतर कंपन्यांसोबत चर्चा झाली आहे. उद्योगासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा देत त्यांच्या अडचणी सोडवल्या जाणार आहेत. दर महिन्याला उद्योगाच्या समस्या सोडवण्यासाठी बैठकादेखील घेतल्या जाणार आहेत. -दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी. कंपनी गुंतवणूक रोजगार ठिकाण

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment