हैदराबादच्या रक्षापुरममध्ये भूलक्ष्मी मंदिरातील मूर्ती फोडली:दोन आरोपींना अटक, मंदिरावर यापूर्वी 5 वेळा झाला होता हल्ला
हैदराबादमधील रक्षापुरम भागातील भूलक्ष्मी मंदिरातील मूर्ती सोमवारी (26 ऑगस्ट) रात्री काही लोकांनी फोडली. याची माहिती मिळताच रात्रीच मंदिरात मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. डीसीपी दक्षिण पूर्व कांतीलाल पाटील घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोपींना लवकरच पकडले जाईल, असे आश्वासन दिले. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून त्यापैकी एक मुख्य आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात मूर्ती तोडण्यामागे कोणताही राजकीय हेतू असल्याचे पुरावे मिळालेले नाहीत. आरोपींच्या चौकशीत आणखी दोन जणांची नावे समोर आली आहेत. मंदिरावर यापूर्वीही हल्ले झाले आहेत भाजप भाग्य नगर जिल्हाध्यक्ष समरेड्डी सुरेंद्र रेड्डी म्हणाले की, ही घटना काही पहिलीच वेळ नाही, गेल्या पाच वर्षांत या मंदिरावर 5 वेळा हल्ला झाला आहे. दोन वर्षांपूर्वी याच परिसरातील विनायक मंडपातही हल्ला झाल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांनी ही घटना घडवून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रेड्डी यांनी केला आहे. पोलिस ठाण्यापासून मंदिर केवळ 450 फूट अंतरावर असल्याचा त्यांचा आरोप आहे. याठिकाणी पोलिसांची गस्तही असते, मात्र घटनेच्या दिवशी पोलिसांची गस्त नव्हती. याप्रकरणी येथील नगरसेवक आणि मंदिराजवळील पान दुकानाच्या मालकाची चौकशी करावी, असे ते म्हणाले.