अवैध वाळु उत्खनन प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यासह तहसिलदार निलंबित:भ्रष्टाचारात लिप्त असल्याचा विभागिय आयुक्तांच्या चौकशीत ठपका

भंडारा जिल्ह्यातील तुमसर उपविभागात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन प्रकरणात महसूल विभागातील दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे आणि तहसीलदार मोहन टिकले यांना निलंबित करण्यात आले असून, नागपूर विभागीय महसूल आयुक्तांच्या चौकशीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे ठपका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, निकाळजे यांनी दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता, तर तहसीलदार टिकले यांची नियुक्ती मार्च 2024 मध्ये झाली होती. एक वर्षाचा काळ भोगला.इतक्या कमी कालावधीतच एवढं मोठं वाळू तस्करीचं जाळं उभं राहणं शक्य आहे का, असा थेट सवाल नागरिक विचारू लागले आहेत. तक्रारीचा धागा – आमदार राजू कारेमोरे व डॉ. परिणय फुके
तुमसर तालुक्यातील वाळू तस्करीप्रकरणी प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार राजू कारेमोरे यांनी तक्रार दाखल केली होती. ही तक्रार पुढे गाजली, जेव्हा माजी मंत्री आणि आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली. फुके यांनी वाळू माफियांशी अधिकाऱ्यांचे संबंध व त्याचे पुरावेही दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधत तातडीने कारवाईचे आदेश दिले. जिल्हा प्रशासनाला ‘संरक्षण’ मिळत होते का?
स्थानिक प्रशासनाच्या वर्तुळात चर्चा आहे की, वाळू उत्खनन, साठेबाजी आणि डंपर वाहतूक या साखळीला जिल्हास्तरावरूनच संरक्षण मिळत होते. अशा परिस्थितीत केवळ दोन अधिकाऱ्यांवरच कारवाई झाल्याने “पाखरं उडवली, पण घरटं तसंच ठेवलं!” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. जिल्हाधिकारी अॅक्शन मोडवर – ९ एप्रिलला अचानक छापे
महसूल मंत्र्यांनी दिलेल्या निलंबनाच्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांसह संपूर्ण महसूल विभाग अॅक्शन मोडवर गेला आहे. भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी यांनी ९ एप्रिल रोजी अनेक ठिकाणी अचानक छापे टाकले. त्यामुळे महसूल प्रशासनात खळबळ माजली असून, अनेक अधिकारी सावध झाले आहेत. सरकारनं बडगा उगारताच अनेकजण सुतासारखे सरळ झाल्याचं चित्र समोर येत आहे. निलंबित एसडीओ नवविवाहित – स्पर्धा परीक्षांसाठी करत होते मार्गदर्शन निलंबित झालेल्या उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे हे नवविवाहित असून, ते स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन करत होते. प्रशासनात सेवा करून समाजासाठी काहीतरी करायचं या हेतूनं त्यांनी अनेक तरुणांना प्रेरित केलं होतं. मात्र त्यांच्यावर आता वाळू तस्करांशी संगनमताचा ठपका ठेवण्यात आला आहे, हे दुर्दैवी चित्र आहे. पर्यावरण विभागाची परवानगी न घेता सुरू होतं उत्खनन तुमसर भागात पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी न घेता वाळू उत्खनन सुरू होतं, हे विभागीय आयुक्तांच्या चौकशीत समोर आलं आहे. महसूल मंत्र्यांनी ही बाब विधानसभेत उघड करत, सात दिवसात चौकशी करून कारवाईचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार अहवाल आल्यानंतर निकाळजे व टिकले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मंत्री बावनकुळेंचा इशारा- कारवाई अटळ अवैध वाळू उत्खनन हा गंभीर गुन्हा आहे. सामान्यांच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्यांवर कारवाई अटळ आहे,” असा इशारा महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिला आहे. परंतु अजूनही या साखळीमागे असलेले मुख्य सूत्रधार मोकळेच आहेत, हे लक्षात घेता ही कारवाई अपुरी वाटत आहे. लोक विचारत आहेत – लहान माशांची नावे उघड करत, मोठ्या माशांना वाचवण्याचा प्रयत्न तर नाही ना? भंडाऱ्यापासून तुमसरपर्यंत सध्या या प्रश्नावरच सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालं आहे.सदर प्रकरणी जिल्ह्यधिकारी संजय कोलते यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.