दोन दिवसांत पालकमंत्रिपदाची यादी कळेल:पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती, म्हणाले – यादी करताना महायुतीत समतोल राखला जाईल
देवेंद्र फडणवीस सरकारच्या शनिवारी खाते वाटप जाहीर झाले. आता मंत्र्यांना पालकमंत्रिपदाची आस लागली आहे. अनेक जण आपणच पालकमंत्री होणार, असा दावा करत आहेत. ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी भाष्य केले आहे. अधिकृत यादी जाहीर होईपर्यत पालकमंत्रिपदावर कुणीही दावा करू शकते, असे शंभूराज देसाई म्हणाले. पालकमंत्री पदाबाबतचा अंतिम निर्णय देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे तिघेजण घेणार आहे. पालकमंत्रिपदाचे वाटप करताना तिनही नेते महायुतीतील समतोल राखतील, असेही पर्यटन मंत्री देसाई म्हणाले. शंभूराज देसाई म्हणाले की, खाते वाटप होईपर्यत चार दिवस याला हे खाते मिळणार त्याला ते खाते मिळणार, अशा बातम्या सुरू होत्या. पण खाते देत असताना समतोल राखण्यात आला आहे. जरा धीर धरा दोन दिवसात पालकमंत्री पदाचे खाते वाटप होईल. अशी प्रतिक्रिया देत ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी भाष्य केले आहे. विरोधकांना जो आरोप करायचा तो करू द्या, पण सर्व खाती सारखी आहेत. कोणतेही खाती मंत्रिमंडळाचे संयुक्तिक जबाबदारी आहे. कोणताही खाते हेवी वेट नाही सर्व समान असल्याचे शंभूराज देसाई म्हणाले. पर्यटन खाते देखील खूप महत्त्वाचे
शंभूराज देसाई यांच्याकडे पर्यटन खाते देण्यात आले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, राज्यामध्ये पर्यटन खाते देखील खूप महत्त्वाचे आहे. लोक आता टुरिझमकडे वळायला लागले आहेत. टुरिझमच्या माध्यमातून अर्थव्यवस्था वाढली आहे. शिंदे साहेब यांनी मला सांगितले आहे, चांगलं काम करायचं आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुरेसा निधी तुमच्या विभागाला दिला जाईल, असे सांगितले असल्याचे शंभूराज देसाई म्हणाले. मुंबई महापालिकेवर आम्ही भगवा फडकवू
यावेळी शंभुराज देसाई यांना मुंबई महापालिका निवडणुकांबाबत प्रश्न विचारण्यात आला असता मुंबई महापालिकेवर आम्ही भगवा फडकवू, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, उबाठा बॅकफूटवर गेली आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे घटनेने, कायद्याने नियमाने आमच्याकडे आहे. मागच्या निवडणुकीत लागलेला निकाल त्यामुळे उबाठा असेल किंवा अन्य दोघे मविआत एकमेकांवर खापर फोडण्याचे काम सुरू आहे. सभागृहात 50 चाही आकडा नाही. विरोधकांमध्ये एकवाक्यता नाही. तिन्ही पक्ष वेगवेगळी भूमिका मांडायचे, अशी टीका विरोधकांवर केली. जसा एकतर्फी निकाल विधानसभेला लागला तसेच महायुतीचा भगवा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकलेला दिसेल, असे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले.