दिल्लीत पहिले ब्राह्मण भवन आणि वसतिगृह:गुढीपाडव्याला होणार समाजार्पण; 500 विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ (एबीबीएम) आणि ब्रह्मोद्योग फाऊंडेशनने महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली आहे. दिल्लीतील पहिल्या ब्राह्मण भवन आणि वसतिगृहाचे समाजार्पण ३० मार्च रोजी गुढीपाडव्याला होणार आहे. या कार्यक्रमाला गोविंददेवगिरी महाराज आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. एबीबीएमचे अध्यक्ष डॉ. गोविंद आर. कुलकर्णी यांनी सांगितले की, पुणे, मुंबई, बंगळुरू, वाराणसी आणि अयोध्या येथेही असे भवन उभारले जाणार आहेत. या वसतिगृहात सुमारे ५०० विद्यार्थ्यांना अल्प शुल्कात राहण्याची सोय असेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये शिक्षणासाठी येताना होणाऱ्या निवासाच्या समस्येवर हे एक उत्तर ठरणार आहे. एबीबीएमने ‘आत्मनिर्भर ब्राह्मण प्रकल्प’ देखील सुरू केला आहे. या अंतर्गत पुढील तीन वर्षांत किमान ३००० उद्योजकांना मदत केली जाणार आहे. प्रत्येक उद्योजकाला ५०,००० रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाईल. संस्था ब्राह्मण विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेची मोफत तयारी, निवास आणि भोजनाची सुविधा देणार आहे. त्यासाठी आयएएस/आयपीएस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच ८ वर्षांच्या मुलांसाठी वेदपाठशाळा सुरू करण्याची योजना आहे.