हिंगोलीतील लाच प्रकरणात दोघांना जामीन मंजूर:फेरफारासाठी घेतली होती लाच
हिंगोली शहरालगत बळसोंड येथे फेरफारासाठी ५० हजाराची लाच घेणाऱ्या तलाठयासह अन्य एकास वसमतच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी ता. ३१ जामीन मंजूर केला आहे. हिंगोली शहरालगत एका तक्रारदाराने खरेदी केलेला प्लॉट फेरफार करून सातबारावर लावण्यासाठी तलाठी विजय सोमटकर याच्याकडे अर्ज दिला होता. त्यानंतरही त्याने प्लॉटचा फेरफार केलाच नाही. त्यामुळे उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर त्यात सुनावणी झाली. यामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयाने प्लॉटचा फेरफार करून सातबारावर नोंदविण्याचे आदेश ता. १ ऑक्टोबर रोजी तलाठी कार्यालयास दिले होते. या आदेशानंतरही सोमटकर याने कुठलीही कार्यवाही केली नाही. त्यानंतर तक्रारदाराने सोमटकर याची भेट घेतली असता त्याने ५० हजाराची लाच मागितली होती. यावरून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ता. २९ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधिक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक विनायक जाधव, प्रफुल्ल अंकूशकर यांच्या पथकाने सापळा रचला होता. यावेळी बळसोंड सज्जा येथे विजय सोमटकर याने लाचेची पंन्नास हजाराची रक्कम जयंत देशमुख याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानंतर त्याने रक्कम घेताच लाचलुचपतच्या पथकाने त्यांना अटक केली. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, या प्रकरणात तलाठी सोमटकर व जयंत देशमुख यांच्या वतीने ॲड. मनिष साकळे यांनी वसमतच्या जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज सादर केला होता. या प्रकरणात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर वसमतच्या न्यायालयाने दोघांचाही जामीन अर्ज शुक्रवारी ता. ३१ मंजूर केला आहे. आरोपींच्या वतीने अॅड. मनिष साकळे यांनी काम पाहिले त्यांना ॲड. गणेश घुगे यांनी सहाकार्य केले.