आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये भाजप मनसे एकत्र!:देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने एकच चर्चा, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. विधानसभा निवडणुकीत मनसेने स्वबळावर निवडणूक लढवल्या, मात्र पक्षाला मोठा धक्का बसला. एकमेव असलेला आमदारही या निवडणुकीत पडला. त्यामुळे आता आगामी स्थानिक निवडणुकांच्या बाबतीत कुठली रणनीती असणार यावर मनसे नेत्यांनी राज ठाकरे यांच्या सोबत चर्चा केली असल्याचे समजते. याच दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला सरकारसोबत ठेवण्यास आवडेल असे सूचक विधान केले होते. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाला सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला निश्चितच रस आणि आनंद आहे, असे म्हंटले होते. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उपक्रमांना पाठिंबा असल्याचे ट्विट केले होते. त्यामुळे आता मनसे आणि भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसेची बैठक झाली होती. या बैठकीत सर्व नेत्यांचे म्हणणे राज ठाकरे यांनी ऐकून घेतले. तसेच आता पुढील स्थानिक निवडणुकांसाठी कशी रणनीती असेल यावर देखील चर्चा झाली असल्याची माहिती आहे. हिंदुत्वाच्या विचारधारेच्या लोकांसोबत आपण राहिले पाहिजे असे मनसेच्या नेत्यांचे म्हणणे असून यावर एकमत असल्याचे देखील बोलले जात आहे. ही केवळ चर्चा असून जोवर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेटून यावर चर्चा करणार नाहीत तोपर्यंत कुठल्याही निष्कर्षावर येणे योग्य ठरणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मैत्री सुद्धा फार पूर्वीपासून आहे. अनेकवेळा देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थावर राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी जात असतात. राज ठाकरे देखील त्यांच्या भाषणात भाजपच्या बाजूने अनेकवेळा बोलले असल्याचे देखील आपण पाहिले आहे. एका भाषणात राज ठाकरे यांनी स्वतः म्हंटले होते की, माझा पक्ष हा महायुतीबाहेरचा पक्ष आहे. पण मी कम्फर्ट झोन कुठे पाहतो तर भाजपसोबत, असे त्यांनी म्हंटले आहे. त्यामुळे विचारधारा एक असल्याने हिंदुत्वाच्या मुद्यावरून मनसे आणि भाजप एकत्र येऊ शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेबद्दल दाखवलेल्या सकारात्मक भूमिकेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे हे भाजपच्या हातातील खेळणे आहे. राज ठाकरेंना भाजप खेळवत ठेवत असल्याची टीका राऊत यांनी केली. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील हिरवा कंदील असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज साहेबांचा विचार हा महाराष्ट्राला पुढे नेण्याचा आहे. त्यांच्या आणि आमचे अनेक अनेक गोष्टी जुळतात, एकत्र येतात. त्यांनी मोदी यांच्या निवडणुकीत पूर्ण सहकार्य केले होते. ते आमच्या विचारांशी सहमत आहेत. आम्ही त्यांच्या विचारांशी सहमत आहोत. आमचे विचार बऱ्यापैकी सारखे आहेत. महाराष्ट्राने या आधी देखील ठाकरे भाजप युती पाहिली आहे. आगामी काळात मनसे भाजपसोबत आली तर त्याचा फायदाच होईल, असे मत बावनकुळे यांनी मांडले आहे.