तुम्ही मराठी माणसं घाण आहात:कल्याणमध्ये कुटुंबावर हल्ला, अधिकाऱ्याने गुंडांना बोलवत केली मारहाण
कल्याण योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्स या हायप्रोफाईल सोसायटीत किरकोळ कारणावरून एमटीडीसीमधील अधिकाऱ्याने गुंडांना बोलावून मराठी कुटुंबावर हल्ला केला आहे. तुम्ही मराठी माणसं घाण आहात. तुम्ही मटण मच्छी खातात. तुमच्या सारखे मराठी माझ्याकडे झाडू मारायला आहेत, असे म्हणत मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एमटीडीसी येथे अकाऊंट मॅनेजर पदावर कार्यरत अधिकाऱ्याने गुंडांना बोलावून ही मारहाण केली आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले असून मुंबई येथील रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. हल्ला करणाऱ्याचे नाव अखिलेश शुक्ला असे आहे. तर मारहाण झालेल्या मराठी कुटुंबाचे कळवीकट्टे असे नाव आहे. अत्यंत क्षुल्लक कारणावरून शुक्ला यांनी गुंडांना बोलावून मारहाण केली आहे. अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करून धूप लावत असते. वर्षा कळवीकट्टे यांच्या घरात हा धूर जात असल्याने व त्यांच्या तीन वर्षांच्या बाळाला धुराचा त्रास होत असल्याने तसेच त्यांच्या घरातील वयोवृद्ध आई यांना दम लागत असल्याने धूप घरात लावण्यास सांगितले. मात्र गीता यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद सुरू असताना बाजूला राहणारे अभिजीत देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख यांनी मध्यस्थी करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. याचा राग शुक्ला याला आला आणि शुक्लाने 10 ते 15 गुंडांना बोलावून देशमुख बंधूंना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या मारहाणीत अभिजीत देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना मुंबईच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्ला हे सोसायटीमधील इतर मराठी माणसांना देखील त्रास देत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. या घटनेनंतर शुक्लावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.