मराठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला नाट्यसंगीताचा बहार:भरत नाट्य मंदिरात तीन दिवसीय मोफत महोत्सवाचा शुभारंभ

आपली अमूल्य परंपरा असलेल्या संगीत रंगभूमीच्या स्वर वैभवाची अनुभूती देणाऱ्या मैफलीत सादर झालेल्या एकाहून एक सरस नाट्यगीतांनी पुणेकर रसिकांची मराठी नववर्षाची पूर्वसंध्या अक्षरशः मंतरून गेली. निमित्त होते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे बालगंधर्व संगीत रसिक मंडळाच्या पुढाकाराने आजपासून सुरू झालेल्या मोफत तीन दिवसीय बहारदार नाट्यसंगीत महोत्सवाचे. पुणेकर रसिकांची नाट्य संगीताची आवड लक्षात घेऊन राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या आणि भरत नाट्य मंदिर येथे आयोजित केलेल्या या नाट्यसंगीत महोत्सवाचे उद्घाटन प्रसिध्द सनदी लेखापाल विजयकांत कुलकर्णी, ज्येष्ठ संगीत नाट्यकर्मी आणि संगीत नाटकाचे अभ्यासक सुरेश साखवळकर आणि ज्येष्ठ तबलावादक पांडुरंग मुखडे यांच्या हस्ते झाले. यानिमित्त सादर झालेल्या रंगबहार मैफलीच्या प्रारंभी ज्ञानेश्वर पेंढारकर, नीलाक्षी पेंढारकर, मुकुंद मराठे, संपदा थिटे, सानिया पाटणकर आणि सुरेश साखवळकर यांनी एकत्रितपणे ‘नमन नटवरा’ ही नांदी सादर केली. संपदा थिटे यांनी सादर केलेल्या ‘संगीत विद्याहरण’ या नाटकातील ‘मधुकर वन वन फिरत करी गुंजारमाला’ या नाट्यगीताने मैफलीचा प्रारंभ झाला. यानंतर ज्ञानेश्वर पेंढारकर यांनी ‘जय गंगे भागीरथी’ हे नाट्यपद सादर केले. नीलाक्षी पेंढारकर यांनी ‘मर्म बंधातली ठेव’ आणि ‘वद जाऊ कुणाला शरण’ या नाट्यपदांव्दारे संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळाचे स्मरणरंजन केले. मुकुंद मराठे यांनी सादर केलेले ‘निराकार ओमकार’ आणि सानिया पाटणकर यांनी सादर केलेले ‘नरवर कृष्णा समान’ ही नाट्यपदे रसिकांची दाद घेऊन गेली. सुरेश साखवळकर यांनी सादर केलेल्या ‘विठ्ठल विठ्ठल गजरी’ या अभंगाने मैफलीचा समारोप झाला. या मैफलीत संजय गोगटे (ऑर्गन), विद्यानंद देशपांडे (तबला), प्रज्ञा देसाई (व्हायोलीन), सुरेश कुलकर्णी (टाळ) या वादक कलाकारांनी साथसंगत केली. कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रसिध्द सनदी लेखापाल विजयकांत कुलकर्णी, ज्येष्ठ संगीत नाट्यकर्मी आणि संगीत नाटकाचे अभ्यासक सुरेश साखवळकर आणि ज्येष्ठ तबलावादक पांडुरंग मुखडे यांनी मनोगत व्यक्त केले. मैफलीचे बहारदार आणि रंजक निवेदन अनुराधा राजहंस यांनी केले. अवंती बायस यांनी आभार मानले.