इंदूरहून आलेल्या ७२ आसनी प्रवासी विमानाचे बेलोरा येथे यशस्वी लँडिंग:अमरावतीकरांना आता नव्या तारखेची प्रतीक्षा; विमानतळावरील कामांना वेग

इंदूरहून आलेल्या ७२ आसनी प्रवासी विमानाचे बेलोरा येथे यशस्वी लँडिंग:अमरावतीकरांना आता नव्या तारखेची प्रतीक्षा; विमानतळावरील कामांना वेग

प्रतिनिधी | अमरावती अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर रविवारी दुपारी अलायन्स एअरलाइन्सच्या एटीआर-७२ विमानाने लँडिंग व टेकऑफ चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. इंदूरहून आलेले ७२ आसनी विमान पहिल्यांदाच बेलोरा विमानतळावर उतरले आहे. दरम्यान २१ मिनिटे थांबल्यानंतर हे विमान पुन्हा इंदूरला जाण्यासाठी येथून उडाले. मात्र, ३१ मार्चला विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार, अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केलेली घोषणा अमरावतीकरांचा भ्रमनिरास करणारी ठरली. आता कधी विमानसेवा सुरू होईल, याबाबतचा कोणताही मुहूर्त संबंधित यंत्रणेकडून जाहीर करण्यात आला नाही. प्रादेशिक संपर्क योजना (आरसीएस) उडान अंतर्गत व्यावसायिक विमान सेवेसाठी या विमानतळाची पूर्ण तयारी असल्याचे दाखवणारे हे विशेष चाचणी विमान इंदूरहून अमरावतीला आले. रविवारी दुपारी ३ वाजून ५६ मिनिटांनी एटीआर-७२ विमानाने बेलोरा येथे सुरक्षित लँडिंग केले. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, नेव्हिगेशन प्रणाली आणि ग्राउंड हँडलिंग क्षमतांचा हा पहिला यशस्वी क्षण होता. त्यानंतर ४ वाजून १७ मिनिटांनी विमानाने पुन्हा इंदूरसाठी उड्डाण घेतले. अमरावती विमानतळ विदर्भाच्या अर्थव्यवस्था, व्यापार, पर्यटन आणि हवाई संपर्कासाठी गेम-चेंजर ठरणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) तर्फे विकसित हे विमानतळ केवळ पायाभूत सुविधा नव्हे, तर उद्योग, व्यवसाय, प्रवाशांसाठी महत्वाचे ठरणार आहे. टियर-२ आणि टियर-३ शहरांना विमानसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा आहे, असे एमएडीसीकडून सांगण्यात आले आहे. अमरावती विमानतळावरून ३१ मार्चला प्रवासी विमानसेवा सुरू होईल, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी १० मार्चला विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना सांगितले होते. त्यानंतर १३ मार्चला डीजीसीएकडून या विमानतळाला परवाना मिळाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यांनीही मार्चच्या शेवटच्या आठवड्यात विमानसेवा सुरू होईल, अशी शक्यता वर्तवली होती. मात्र, ३१ मार्चला विमानसेवा सुरू होणार नाही, हे स्पष्ट झाले. त्यामुळे दहा ते बारा वर्षांपासून विमान उड्डाणाच्या विविध तारखा ऐकणाऱ्या अमरावतीकरांना आता पुन्हा नवी तारीख ऐकावी लागणार आहे. दरम्यान तारीख अद्याप निश्चित नसली तरी एकंदरीत विमानतळावरील कामाची प्रगती लक्षात घेता लवकरच बेलोरावरून विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. दोन्ही वैमानिक सादर करणार डीजीसीए, अलायन्सला अहवाल इंदूरहून बेलोरा विमानतळावर आलेले अलायन्स एअरलाइन्सच्या एटीआर-७२ या विमानाचे लँडिंग व टेकऑफ कसे राहिले. विमानतळावरील सर्व उपकरणे, यंत्रणा व्यवस्थित काम करत होत्या की नाही. व्यवस्थित संदेश वहन झाले की नाही. कोणत्या यंत्रणेने कशाप्रकारे प्रतिसाद दिला. याबाबत दोन्ही वैमानिक डीजीसीए तसेच अलायन्स एअरलाइन्सला अहवाल सादर करणार आहेत. दोन्ही अहवाल सकारात्मक राहतीलच, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. परंतु, त्यांनी काही सुधारणा सुचवल्या तर त्या करून त्यानंतरच अलायन्स एअरलाइन्स बेलोरा विमानतळावर सेटअप उभारेल. सेटअप पूर्ण झाल्यानंतरच ऑनलाइन प्रवासी तिकीट विक्री सुरू होईल, अशी माहिती विमानोड्डाण तज्ज्ञांनी दिली.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment