पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली:राज्याच्या गृह विभागाने दिली ऑर्डर, वैष्णवी हगवणे प्रकरणात कारवाईला वेग

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आरोपी पती शशांक हगवणे यांचे मामा पुण्याचे कारागृह पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची पुण्यातून बदली करण्यात आली आहे. सुपेकर यांना आता महाराष्ट्र होमगार्ड उपमहासमादेशक पदावर बदली करण्यात आली आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सासरे राजेंद्र हगवणे, पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे आणि दीर असे चौघांना अटक करण्यात आली आहे. आज बंदूकधारी नीलेश चव्हाणला नेपाळच्या बॉर्डरवरून अटक केली आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी कारवाईला वेग आला असल्याचे दिसत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आयजी सुपेकर यांच्या विरोधात आवाज उठवला होता. तसेच त्यांची चौकशी करून त्यांच्या बदलीचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्याच्या गृह विभागाने परिपत्रक काढून जालिंदर सुपेकर यांची आज बदली केली आहे. गृह विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार, महाराष्ट्र पोलिस अधिनियम (1951 च्या 22) याच्या कलम 22 न मधील तरतुदींनुसार, पुढील तक्त्यातील स्तंभ (2) मध्ये नमूद भा.पो.से. अधिकारी यांची, स्तंभ (3) मध्ये नमूद पदावरुन स्तंभ (4) मध्ये निर्दिष्ट पदावर, याद्वारे, प्रशासकीय कारणास्तव, बदलीने पदस्थापना करण्यात येत आहे, असे आदेशात म्हटले आहे. हा शासन आदेश, आस्थापना मंडळ क्र. 1 च्या शिफारशींचा यथायोग्य विचार करुन व महाराष्ट्र पोलीस अधिनियम (1951 चा 22) याच्या कलम 22 न मध्ये नमूद सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या सहीने हा आदेश पारीत करण्यात आला आहे. या आदेशानुसार पुण्यातील कारागृह व सुधारसेवा विशेष पोलिस महानिरीक्षक पदावरुन जालिंदर सुपेकर यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. उपमहासमादेशक होमगार्ड, महाराष्ट्र राज्य या पदावर त्यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. त्यामुळे, जालिंदर सुपेकर यांना मोठी जबाबदारी देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, त्यांच्याच, सहीने सुशील आणि शशांकला शस्त्र परवाना 2022 मध्ये शस्त्रपरवाना मिळाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी, हगवणे बंधुंनी परवान्यासाठी खोटे पत्ते दिल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.