इरादे खंजर के तो नेक नहीं हो सकते:हे विधेयक मुस्लिमांच्या हिताचे असूच शकत नाही, अबू आझमींची वक्फ दुरुस्ती विधेयकावर टीका

इरादे खंजर के तो नेक नहीं हो सकते, असे म्हणत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केंद्र सरकारच्या वक्फ दुरुस्ती विधेयकावर तसेच केंद्र सरकारवर टीका केली आहे. बुधवारी रात्री उशिरा वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाले आहे. त्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यावर आमदार अबू आझमी यांनी प्रतिक्रिया देत सरकारवर टीका केली आहे. पत्रकारांशी बोलताना अबू आझमी म्हणाले, इरादे खंजर के नेक नहीं हो सकते. ज्या लोकांनी सरकार आल्यानंतर सुद्धा मुस्लिमांच्या हिताचे एकही काम नाही केले मुस्लिमांच्या मशिदींच्या खाली मंदिर शोधत आहेत. मंदिर भरल्यानंतर बाहेर प्रार्थना करण्यासाठी लोक उभे राहू शकतात. पण मशिदी भरल्यानंतर मुस्लिम लोक बाहेर नमाज नाही अदा करू शकत. जर तसे केले तर परवाना रद्द केले जात आहे. हे लोक जे विधेयक आणत आहेत ते मुस्लिमांच्या हिताचे असूच शकत नाही, असे अबू आझमी म्हणाले. पुढे बोलताना अबू आझमी म्हणाले, त्यांना आमच्या या जमिनी बळकावयाच्या आहेत. आमच्या पूर्वजांनी ज्या जमिनी मशिदींसाठी, स्मशानभूमीसाठी जे वक्फ घेतले होते त्यावर यांचा डोळा आहे. हे लोक मुस्लिमांच्या हिताचे कधीच काम करू शकत नाहीत. आजपर्यंत त्यांनी जे काही काम केले आहे ते सगळे मुस्लिमांच्या विरोधात केले आहे, असा आरोपही अबू आझमी यांनी केला आहे. अबू आझमी म्हणाले, या देशाला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी यांचे हे पाऊल पडत आहे ते मुस्लिमांवर अन्याय केला जात आहे. राज्यसभेत देखील हे विधेयक मंजूर होणार आहे कारण त्यांच्याकडे बहुमत आहे. मी पक्षातील वरिष्ठांशी बोलून पुढील भूमिका ठरवणार आहे. देशात देखील यांचे बहुमत आहे, त्याच आधारे तर बाबरी मशिदीत मंदिर बनवण्यात आले आहे. मात्र, आम्ही या विधेयकाचा विरोध करणार आणि करत राहणार, असे अबू आझमी म्हणाले. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील या विधेयकावर टीका केली आहे. सुधारणा विधेयकमध्ये काही मुद्दे चांगले आहेत. वक्फ बोर्ड जमिनी तुम्ही ताब्यात घेणार असं म्हणताय, म्हणजे त्यांच्या जमिनीवर यांचा डोळा आहे. जिन्नांना लाजवेल अशी मुस्लिमांची बाजू घेणारी भाषण अमित शाह यांच्यासह त्यांच्या मित्र पक्षाच्या नेत्यांनी केली. जे तुम्ही म्हणताय आम्ही हिंदुत्व सोडलं, ते गद्दार मुस्लिमांची स्तुती करत होते. तेव्हा तुम्ही शांत का बसले? कुठे गेले बाळासाहेब ठाकरे यांचे विचार? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता.