उद्धव ठाकरेंच्या बॅगची सलग दुसऱ्या दिवशी तपासणी:औशात काढला दुसरा व्हिडिओ; अधिकाऱ्यांना मोदी, शहांच्या बॅगांची तपासणी करण्याची तंबी

उद्धव ठाकरेंच्या बॅगची सलग दुसऱ्या दिवशी तपासणी:औशात काढला दुसरा व्हिडिओ; अधिकाऱ्यांना मोदी, शहांच्या बॅगांची तपासणी करण्याची तंबी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यभरातील नेत्यांच्या बॅगांची आणि गाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. यवतमाळ येथे उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी झाल्यानंतर राज्यभरात आरोप – प्रत्यारोप सुरू झाले होते. उद्धव ठाकरे यांनी स्वतः व्हिडिओ काढत याबाबत निवडणूक आयोगावर टीका केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा औसा येथे सभेसाठी जाताना उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. आजही उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ शूट करत निवडणूक आयोगावर पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप केला. ज्या प्रकारे आमच्या बॅगा तपासल्या जात आहेत, त्याप्रमाणेच मोदी, फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या देखील बॅगांची तपासणी करा, अशी तंबी यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिली. तसेच त्यांच्या बॅगांची तपासणी करतानाचा व्हिडिओ त्यांनी आपल्या स्वतःच्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केला. यावेळी ते प्रत्येक अधिकाऱ्याला त्याचे नाव आणि तो कोणत्या जिल्ह्यातील राहणार असल्याचा प्रश्न विचारताना दिसून आले तसेच यापुढे जो कोणी नेता तुमच्या मतदारसंघात येईल, त्या सर्वांच्या बॅगांची तपासणी करा, अशी तंबी देखील त्यांनी या अधिकाऱ्यांना दिली. उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी केल्यामुळे ते चांगलेच भडकल्याचे दिसून आले. कालही बॅग तपासणीवरून उद्धव ठाकरेंचा थयथयाट वणी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आमदार मिलिंद नार्वेकर हे सोमवारी वणी येथे आले होते. कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर त्यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले होते. मात्र तिथे निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या पथकाकडून ठाकरे व नार्वेकर दोघांच्याही हेलिकॉप्टरमधील बॅगची तपासणी करण्यात आली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. त्यांनी तपासणी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कडक शब्दांत जाब विचारला. या वेळी उद्धव ठाकरे यांनी वाद घालून अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादाचा व्हिडिओही सोशल मीडियावर प्रसारित करण्याची व्यवस्था केली. ‘आमच्या बॅगची तपासणी करता? तुम्ही मिंध्यांच्या (शिंदे) बॅगची कधी तपासणी केली का? मोदी-शाह यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली का? जशा आमच्या बॅगा तपासता तशा त्यांच्याही तपासून मला व्हिडिओ पाठवा,’ असे त्यांनी सुनावले. मात्र अधिकाऱ्यांनी तपासणीचे काम पूर्ण केले. बॅगांमध्ये काहीच आक्षेपार्ह सापडले नाही. ‘वणी येथे तुमचाच पहिला दौरा आहे, त्यामुळे तुमच्या बॅगची तपासणी केली जातेय,’ असे निवडणूक कर्मचाऱ्यांनी ठाकरेंना सांगितले. पण त्यावर त्यांचे समाधान झाले नसल्याचे दिसून आले होते. या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा…. देवाभाऊ-दाढीभाऊ-जाकेटभाऊ, तिघे मिळून ‘महाराष्ट्र खाऊ’:अमित शहा गृहमंत्र्यांच्या लायक नाही; ठाकरेंचा मोदी-शहांवर हल्लाबोल देवाभाऊ-दाढीभाऊ-जाकेटभाऊ हे तिघे मिळून ‘महाराष्ट्र खाऊ’ करत असल्याचा ओरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्याचसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत असल्याचे म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला. महाराष्ट्रातून निघताना मोदी आणि शहा यांच्या देखील बॅगा तपासा, कारण ते महाराष्ट्र लुटून जात असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. या माध्यमातून ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली. पूर्ण बातमी वाचा…

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment