हयातीचा दाखल 30 नोव्हेंबर पर्यंत सादर करणे अनिवार्य ४८ हजार:48 हजार पेन्शनर्सचा प्रश्न, जि. प. कडून अद्याप बँकांना पेन्शनर्सची यादीच उपलब्ध करून दिली नाही
शहर जिल्ह्यातील सर्व कोषागार व जिल्हा परिषद पेन्शनर्स यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत हयातीचा दाखल सादर करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय पेन्शन मिळत नाही. त्यामुळे वेळेत हयात दाखला सादर करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेचे ८ हजार व कोषागारचे ४० हजार असे एकूण ४८ हजार पेन्शनर्सचा हा प्रश्न आहे. जिल्हा परिषदेकडून अद्याप बँकांना पेन्शनर्सची यादीच उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे पेन्शनर्स धारकांना बँकेत खेटे माराव्या लागत आहेत. १ ते ३० नोव्हेंबर दरम्यान पेन्शनर्सची पडताळणी करण्यात येते. पेन्शनर्सना पूर्वी अधिकाऱ्यांकडून स्वाक्षरी करून अर्ज दाखल करावे लागत होते. आता जिल्हा परिषद व कोषागार प्रशासन बँकांना पेन्शनर्सची यादी व अर्ज उपलब्ध करून देतात. त्याची बँकेचे अधिकारी पडताळणी करून त्याची माहिती परत संबंधित विभागाला पाठवली जाते. त्यानंतर पेन्शन सुरू ठेवले जाते. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बँक खाते ज्या बँकेत आहेत तिथे स्वत उपस्थिती राहून हयात असल्याचा अर्ज भरून देणे आवश्यक आहे. त्याचे पालन जे करणार नाहीत त्यांचे पेन्शन बंद होऊ शकते. त्यामुळे पेन्शनर्स धारकांनी जातीने बँकेत जाऊन वेळेत हयात असल्याचा दाखला भरून द्यावा. असे आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष वसंत सबनीस, कार्याध्यक्ष विलास जाधव, सहसचिव अरविंद देशमुख आदींनी केले आहे.तसेच जिल्हा परिषद प्रशासनाने पेन्शनर्सची यादी व अर्ज त्वरीत बँकांना उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून वेळेत पेन्शनर्स हयात अर्ज भरतील व त्यांचे पेन्शन पुढे सुरू राहील, अशी मागणीही त्यांनी केली आहे.”