जैन समाजाचा मुंबईत विराट मोर्चा:महापालिकेने सुनावणीपूर्वीच मंदिर तोडले, लाखो समाजबांधव रस्त्यावर, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

न्यायालयातली सुनावणी होण्यापूर्वीच मुंबई महापालिकेने जैन समाजाचे विर्लेपार्ले येथील मंदिरावर तोडक कारवाई केली. त्यामुळे लाखो जैन समाजबांधव रस्त्यावर उतरलेत. विशेष म्हणजे या मोर्चाला कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार पराग अलवाणी, जैन समाजाच्या संतांनी पाठिंबा दिला आहे. अखिलेश यादव यांनी सुद्धा या कारवाईवरून भाजपला धारेवर धरले होते. विलेपार्ले पश्चिम रेल्वे स्थानकापासून अतिशय शांततेत हा मोर्चा निघाला. या मोर्चात प्रचंड संख्येने समाजबांधव सहभागी झालेत. महापालिकेच्या कारवाईविरोधात त्यांनी अहिंसक मार्गाने आपला रोष व्यक्त केला आहे. नेमके प्रकरण काय? मुंबईतल्या विलेपार्ले पूर्वमधील कांबळीवाडी येथील 30 वर्ष जुने पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर होते. या मंदिरावर महापालिकेच्या पथकाने 16 एप्रिल रोजी कारवाई केली. महापालिकेने या कारवाईपू्र्वी मंदिराला एक नोटीस पाठवली होती. याविरोधात एक याचिकाही दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर 17 एप्रिल 2025 रोजी सुनावणी होणार होती. त्यामुळे मंदिरावर कारवाई करू नका, अशी विनंती लोकांनी आणि भाविकांनी केली. मात्र, ही सुनावणी होण्यापूर्वीच ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे जैन समाजबांधव आक्रमक झालेत. त्यांनी अहिंसक मार्गाने आपला रोष आज शनिवारी व्यक्त केला. मंगलप्रभात लोढा यांचे आवाहन मंत्री मंगलप्रभात लोढा या आंदोलनात सहभागी झाले आहेत. लोढा यांनी महापालिकेच्या या कारवाईचाही निषेध केला होता. तसेच मुंबईत होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केले होते. त्यामध्ये ते म्हणतात की, ‘धर्माचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे!. विलेपार्ले येथील भगवान पार्श्वनाथाचे आमचे पूजनीय जैन मंदिर पाडण्यात आले आहे, ही केवळ एक इमारत नाही तर आमच्या श्रद्धेवर, संस्कृतीवर आणि धर्मावर हल्ला आहे! शनिवार, 19 एप्रिल 2025 रोजी, आपण सर्वांनी या अन्यायाविरुद्ध एकत्र यायचे आहे, आपली एकता दाखवण्यासाठी ही रॅली काढली जाईल. तुम्हीही यात सामील व्हा!, रॅलीची वेळ सकाळी 9 वाजता असेल, असे आवाहन त्यांनी केले होते. कारवाई अयोग्य केली काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, जैन समाज हा सहिष्णू आहे, असे असताना त्यांचे इतके जुने मंदिर पाडण्यात आले. सातत्याने अल्पसंख्याक समाजाला का टार्गेट केले जात आहे, सरकारला समाजात शांतता ठेवायची नाहीये का, असा सवाल त्यांनी केला. कोणतीही नोटीस न देता कारवाई केली ही अयोग्य आहे
ज्यांनी हे काम केले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. पूर्वनियोजित षडयंत्र काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड मीडियाशी बोलताना म्हणाल्या की, जैन समाजाची मागणी काय आहे? मंदिर पाडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. त्यांची मागणी योग्य आहे. दोन जेसीबी आणले. महिलांवर हल्ला झाला. याचा या मोर्चातून निषेध होतो आहे. जैन समाज शांतीप्रिय आहे. त्याचा आवाज कधी ऐकला होता का? पण त्यांनाही आज रस्त्यावर उतरावे लागले. कारवाई करण्याची पद्धत, बेकायदा गोष्टींना समर्थन म्हणून त्यांना रुद्रावतार धारण करावा लागला. हा आवाज डबल इंजिन सरकारसाठी आहे. राजस्थान, मुंबईत जैन समाजाचे मोर्चे निघत आहेत. आश्चर्य याचे वाटते की, सत्ताधारी पक्षाचे आमदार, मंत्री रॅलीत सामील होतात. हे त्यांचेच सरकार आहे. श्रद्धा स्थान सांभाळणे त्यांचे काम आहे. मात्र, ते होताना दिसत नाही. ही कारवाई पूर्वनियोजित होती. हे षडयंत्र आहे. याविरोधात शांतताप्रिय जैन समजाला रस्त्यावर उतरावं लागले आहे. अखिलेश यादव आक्रमक समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव यांनी या कारवाईवरून एक ट्विट करून भाजपवर निशाणा साधला आहे. आजच्या काळात देशात अल्पसंख्याक असणे हा एक शाप ठरत आहे. सध्या जैन समाजामध्ये असलेली भीती, असुरक्षितता आणि अनिश्चितता अत्यंत चिंताजनक आहे. याकडे जगभरातून लक्ष वेधले गेले आणि निषेध केला गेला. भारतातील शांतताप्रिय जैन समाजाला पद्धतशीरपणे लक्ष्य केले, असा आरोपही अखिलेश यादव यांनी केला आहे. अखिलेश यादव यांनी मध्य प्रदेशातील सिंगोली येथे जैन साधूंवर झालेला हिंसक हल्ला, जबलपूरमधून लीक झालेली ऑडिओ क्लिप ज्यामध्ये भाजपच्या सदस्यांनी जैनांविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली होती आणि मुंबईतील जैन मंदिराची तोडफोड, जेथे पवित्र मूर्ती, धर्मग्रंथ आणि धार्मिक पुस्तकांची कथितपणे विटंबना केली गेल्याचा संदर्भही दिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत जैन समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. साधारणतः 50 लाखांच्या वर हा आकडा असू शकतो. मुंबईत जैन समाजाच्या 108 च्या वर वेगवेगळ्या संघटना कार्यकत आहेत. येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. त्याच्या तोंडावर विशेषतः मुंबईमध्ये मराठी विरुद्ध हिंदी या वादाला पुन्हा एकदा फोडणी मिळाल्याचे दिसते. मुंबई महापालिकेने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 74,427 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. देशातली सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून मुंबईची ओळख आहे. त्यामुळे मुंबईवर सत्ता मिळवण्यासाठी भाजप, दोन्ही शिवसेना, मनसे, दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या घडणाऱ्या घटना, घडामोडीकडे सर्व देशाचे लक्ष आहे.