‘जैश’च्या रईस अहमद शेखचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला:संघ मुख्यालयाची रेकी केल्याचा ठपका, 2021 मध्ये झाली होती अटक

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी रईस अहमद शेख याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी फेटाळून लावला. रईस शेख याला नागपूरच्या रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृति मंदिराची रेकी केल्याप्रकरणी १५ सप्टेंबर २०२१ रोजी अटक करण्यात आली होती. सध्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात असलेल्या रईसने प्रथम कनिष्ठ न्यायालयात जामीन मागितला होता. तो फेटाळल्यानंतर त्याने ११ मार्च रोजी उच्च न्यायालयात धाव घेतली. आरोपीचे वकील निहाल सिंह राठोड यांनी त्याच्याविरुद्ध कोणतेही पुरावे नसल्याचा युक्तिवाद केला. मात्र, सरकारी वकील देवेंद्र चौहान यांनी आरोपी बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये जिवंत हातबॉम्ब बाळगल्याप्रकरणीचा खटलाही न्यायालयाच्या निदर्शनास आणला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने रईसला जामीन नाकारला.