जानवे घातले असेल तरच प्रवेश करा अन्यथा बाहेर जा:राम मंदिराच्या पुजाऱ्याने माजी खासदार रामदास तडस यांना गाभाऱ्यात जाण्यासाठी रोखले

राम नवमीनिमित्त माजी खासदार रामदास तडस सपत्नी देवळी येथील श्रीराम मंदिरात दर्शनासाठी गेले असता, तेथील पुजाऱ्याने त्यांना गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर रोखले, जानवे घातले असेल तरच प्रवेश करा अन्यथा बाहेर जा, असा प्रकार रविवार रोजी घडला आहे. त्यामुळे माजी खासदारांना अशा प्रकारची वागणूक देण्यात येत असेल तर सर्व सामान्य नागरिकांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जात आहेत. माजी खासदार रामदास तडस त्यांच्या पत्नी शोभा तडस यांच्या सोबत नगरसेवक नंदू वैद्य व इतर भाजपचे पदाधिकारी देवळी येथील श्रीराम मंदिरात दर्शनासाठी गेले होते. पूजा करण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेल्यानंतर त्यांना गाभाऱ्यात जाण्यासाठी तेथील पुजाऱ्यांनी रोखले. रामदास तडस यांनी पूजाऱ्याला विचारणा केली असता, तुम्ही जानवे सोवळे घातले असेल तरच गाभाऱ्यात प्रवेश दिला जाईल अन्यथा नाही. प्रवेश नाकारल्यानंतर तडस व त्यांच्या पत्नी शोभा तडस यांनी बाहेरून श्रीरामाचे दर्शन घेतले आणि परतले. या प्रकरावर रामदास तडस म्हणाले, मी व माझी पत्नी इतर सहकारी श्रीराम मंदिर मध्ये दर्शन घेण्यासाठी गेलो असता, तेथील पूजा करणारे पुजारी यांनी मला पूजा करण्यासाठी रोखले मी विचारणा केली असता आपण जानवे व सोवळे परिधान केले असेल तर तुम्हाला गाभाऱ्यात दर्शन घेण्यासाठी जाता येईल असे सांगण्यात आले. मी त्यांना म्हटले की आम्ही चाळीस वर्षांपासून दर रामनवमीला इथे येतो. हे बरोबर नाही. एकीकडे रामावर माझी श्रद्धा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम भक्तांसाठी भव्य रामाचे मंदिर उभारले आणि दुसरीकडे तुम्ही आम्हाला मनाई करता, हे योग्य नाही. पुढे बोलताना तडस म्हणाले, मी त्यांना विचारले तुम्ही कसे गेले, त्यावर ते म्हणाले मी सोवळे घातले आहे. मला वाटते हे त्यांचे बोलणे सयुक्तिक नव्हते, त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांनी त्याचा निषेध केला. कार्यकर्ते आणि त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला. तेव्हा मी म्हटले आज रामनवमीचा दिवस आहे. आज संघर्ष बरोबर नाही. मी कार्यकर्त्यांना समजावले, आमच्या आमदारांनी सुद्धा या पुजाऱ्याला समज दिली. या देवस्थानाची दोनशे एकर जमीन आहे. मात्र तरी देखील सर्व गोष्टी आम्ही आमच्या पैशांमधून मंदिरासाठी करतो, अशी त्यांची तिथे मक्तेदारी चालते.