जयंत पाटलांचे मन सध्या कशातच लागत नाही:त्यांनी स्वतःच नागपुरात मला सांगितले, हसन मुश्रीफ यांचा दाव्याने शरद पवार गटात खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मन सध्या कशातच लागत नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. विशेष म्हणजे स्वतः जयंत पाटील यांनीच नागपूर मुक्कामी ही गोष्ट आपल्याला सांगितल्याचे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे जयंत पाटलांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा पुन्हा नव्या दमाने सुरू झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पार धु्व्वा उडाला. तर सत्ताधारी महायुतीला दैदिप्यमान मताधिक्य मिळाले. तेव्हापासून जयंत पाटील हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात नाराज असल्याची चर्चा झाली आहे. मध्यंतरी भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सांगलीच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा जयंत पाटील भाजपमध्ये जाण्याची अटकळ व्यक्त केली जात होती. तत्पूर्वी, ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी जयंत पाटील यांचे मन कशातच लागत नसल्याचा दावा केला आहे. जयंत पाटलांचे मनपरिवर्तन झाले काय? जयंत पाटील यांनी एकदा मला नागपूर येथे एक गोष्ट बोलून दाखवली होती. ते म्हणाले होते मुश्रीफ साहेब माझे मन सध्या कशातच लागत नाही. कदाचित सत्तेत नसताना 5 वर्षे पक्ष टिकवणे फार अवघड असल्याची कल्पना त्यांना आली असावी. किंवा त्यांचे मनपरिवर्तन झाले असावे. आता त्यांचे खरेच मनपरिवर्तन झाले का हे त्यांनाच विचारावे लागेल, असे हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे जयंत पाटील यांनी बुधवारी प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आझाद मैदानातील आंदोलनाला भेट दिली होती. त्यावेळी बोलताना त्यांनी माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका असे सूचक विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर जयंत पाटलांच्या मनात चाललंय तरी काय? ते शरद पवारांची साथ सोडणार काय? अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हसन मुश्रीफ यांनी जयंत पाटील यांच्या मनातील अस्थिरता विषद केली आहे. शक्तिपीठ महामार्गावर मी शेतकऱ्यांसोबत हसन मुश्रीफ यांनी यावेळी शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्यावर होणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधाभासी आंदोलनावरही भाष्य केले. ते म्हणले, मी शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्यावर शेतकऱ्यांसोबत आहे. पण शेतकरीच आपली भूमिका बदलणार असतील तर माझा नाईलाज आहे. या प्रकरणी काही शेतकरी अचानकपणे पुढे येऊन या महामार्गाचे समर्थन करत आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनीच यासंबंधी काय करायचे ते ठरवावे. या प्रकरणी निवडणुकीपूर्वी कुणी काय घेतले, काय नाही हे संजय राऊत यांना माहिती असेल तर त्यांनी ते पुराव्यानिशी सिद्ध करावे असे माझे त्यांना आव्हान आहे. धनंजय मुंडे निर्दोष ठरले तर त्यांना पुन्हा मंत्रिपद हसन मुश्रीफ यावेळी धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या मंत्रिपदावर बोलताना म्हणाले, सद्यस्थितीत धनंजय मुंडे यांच्याकडील खाते अजित पवारांकडे आहे. चौकशीनंतर धनंजय मुंडे निर्दोष सिद्ध झाले तर ते खाते त्यांना पुन्हा द्यावे लागेल. अजित पवारांनी इतिहासाच्या मुद्यावर वादग्रस्त विधान करणाऱ्या नीतेश राणे यांचा समाचार घेतला आहे. मी स्वतःही नीतेश यांची भेट घेऊन त्यांच्याशी याविषयी बोलणार आहे. ते माझे चांगले मित्र आहेत, असे ते म्हणाले.