जेऊरवाडीमध्ये कलश मिरवणूक, यात्रा सुरू:जगदंबादेवी व संत सेवालाल महाराज यात्रेस प्रारंभ

जगदंबा देवी व संत सेवालाल महाराज यात्रा महोत्सवास जेऊरवाडी (ता. अक्कलकोट) येथे उत्साहात प्रारंभ झाला. सोमवारी सकाळी संत श्री सेवालाल महाराज पालखीमधील पादुकांना हिळ्ळी येथील भीमा नदीत गंगास्नान घालून अभिषेक करण्यात आला. दरम्यान या पालखीसोबत बंजारा भजन पथकासह सेवालाल महाराज खडाऊ, मानाची काठी घेऊन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सेवालाल मंदिरास महाभोग व देवीला आरदासचा कार्यक्रम पार पडला. दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. रात्री १० वाजता मानसिंग महाराज, धनसिंग महाराज यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. मंगळवारी सकाळी आरती, पूजेनंतर संत सेवालाल महाराज व जगदंबा देवीस नेवैद्य दाखवण्यात येणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता अबाल वृद्धांसह प्रत्येकाच्या घरी आलेली पाहुणे मंडळी मंदिरात उपस्थित राहुन जगदंबादेवी व संत सेवालाल महाराज यांना महाभोग व गावावर अखंड सुख समृद्धी रहावी, यासाठी अरदास करतील. कलश मिरवणूक, सुवासिनींनी धरला फेर सकाळी १० वाजता गंगास्नानानंतर पालखीचा गावात प्रवेश झाला. त्यावेळी सुवासिनींनी आरती करून १०१ कलशांसह गावातून मिरवणूक काढली. या वेळी घरासमोर पालखी येताच भाविकांनी नारळ, तूप, साखर वाढवून पूजन केले. या वेळी महिलांनी फेर धरला.