जिल्हा परिषद शाळेतील अस्सल हिरे:दीड मिनिटात सांगतो 120 तालुक्यांची नावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही घेतली दखल
यवतमाळ जिल्ह्यातील एका खेडागावातील दोन मुलांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सहावीत शिकणाऱ्या अनिकेत पांडे या विद्यार्थ्याला विदर्भातील 11 जिल्हे आणि त्यातील सर्व तालुक्यांची नावे तोंडपाठ आहेत. केवळ दीड मिनिटात तो सर्व तालुक्यांची नावे सांगतो. नुसते नावेच नाही, तर कोणत्या जिल्ह्यात किती व कोणते तालुके आहे, हे सुद्धा न अडखळता सांगतो. तर दुसरीतील सुदीप पांडे याला महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावे विभागवार पाठ आहेत. या दोघांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. अनिकेत आणि सुदीप हे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एकंबा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षण घेतात. या शाळेत दोन शिक्षक, 50 विद्यार्थी असून 1 ते 7 वी पर्यंतचे वर्ग आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी मुख्याध्यापक कल्याण बोंबले आणि विषय शिक्षक अविनाश नरवाडे या दोघांनी मिळून एक उपक्रम राबवला. या विद्यार्थ्यांची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटवर पोस्ट करत शाळेतील शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच या विद्यार्थ्यांना हिऱ्याची उपमा दिली. काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
विदर्भातील 11 जिल्हे आणि त्यातील 120 तालुक्यांची नावे मुखोदगत असलेला सहावीत शिकणारा अनिकेत रवींद्र पांडे… नद्या आणि त्यांची उगमस्थाने सांगणारा, विभागश: जिल्ह्यांची नावे सांगणारा दुसरीतील सुदीप दीपक पांडे… अशी अनेक उदाहरणे अलिकडे माझ्या पाहण्यात आली. अभ्यासाव्यतिरिक्त सामान्य ज्ञानाचा हा पाठांतरक्रम थोडा वेगळा आणि मनाला सुखावणारा वाटला. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आले. यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मी माहिती घेतली. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, एकंबा, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ येथील हे विद्यार्थी आहेत. अविनाश नारवाडे त्यांचे शिक्षक आहेत, तर कल्याण बोबळे हे तेथे मुख्याध्यापक आहेत. समस्त शिक्षकवृंद आणि या प्रतिभाशाली विद्यार्थ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. 900 लोकसंख्या असलेल्या या गावातील हे अस्सल हिरे आहेत. शिकत रहा आणि खूप मोठे व्हा…माझ्या शुभेच्छा कायम तुमच्यासोबत आहेत…! माझे विद्यार्थी आणि मी या नावाने पेज
या शाळेतील मुलांचे सोशल मीडियावरील व्हिडिओ चांगलेय व्हायरल झाले आहेत. अविनाश नरवाडे यांनी सोशल मीडियावर माझे विद्यार्थी आणि मी या नावाने चॅनल बनवले आहे. आज या चॅनलवर जवळपास 5 कोटी लोकांनी या शाळेतील मुलांचे व्हिडिओ पाहिले आहेत. या उपक्रमात उमरखेडचे गटशिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाड यांनीही सहकार्य केले.