जिल्हा परिषदेच्या तीन अधिकाऱ्यांना एसीबीने केली अटक:कंत्राटदाराच्या बिलासाठी १.४२ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

जिल्हा परिषदेच्या तीन अधिकाऱ्यांना एसीबीने केली अटक:कंत्राटदाराच्या बिलासाठी १.४२ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यासह तीन वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांची बिले अदा करण्यासाठी लाच स्विकारताना या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या तिघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये कार्यकारी अभियंता (दक्षिण विभाग) बाबुराव कृष्णा पवार (वय ५७ वर्षे), उपअभियंता दत्तात्रेय भगवानराव पठारे (वय ५७ वर्षे) आणि कनिष्ठ अभियंता अंजली प्रमोद बगाडे यांचा समावेश आहे. ‘लाचलुचपत’च्या पुणे विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे‌. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त दयानंद गावडे यांनी सांगितले. याप्रकरणी एका ५७ वर्षीय कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने जिल्हा परिषदेकडून निविदा प्रक्रियेतून मिळालेली विकासकामे पूर्ण केली होती. या पूर्ण केलेल्या कामांची देयके जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे प्रलंबित होती. ही रक्कम हवी असेल तर, अदा करावयाच्या एकूण रकमेच्या २ टक्के रक्कम लाच म्हणून द्यावी लागेल, अशी मागणी या अधिकाऱ्यांनी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यानुसार १ लाख ४२ हजार रूपायांची लाच स्वीकारताना या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक कल्पेश जाधव हे करत आहेत. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, व अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ .शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केल्याचे पोलीस निरीक्षक रुपेश जाधव यांनी सांगितले. ठेकेदारांची आर्थिक पिळवणूक थांबवा – रवींद्र भोसले राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना विकासकामे देण्याची तरतूद सरकारने केली आहे. यानुसार आम्ही सर्व कंत्राटदार इमानेइतबारे कामे पूर्ण करतो. परंतु केलेल्या कामांचा मोबदला मिळण्यासाठी अधिकाऱ्यांकडून कंत्राटदारांची मोठी आर्थिक पिळवणूक केली जात आहे. ही पिळवणूक कायमस्वरूपी थांबावी, अशी अपेक्षा पुणे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले यांनी व्यक्त केली आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment