जुन्या भांडणाच्या रागातून दोन गटात तुंबळ हाणामारी:सातारा जवळील जकातवाडी परिसरातील घटना, महिलेचे छेड काढल्याचे ठरले निमित्त

जुन्या भांडणाचा राग आणि त्याला महिलेची छेड काढण्याचे निमित्त झाल्याने जकातवाडी, (ता. सातारा ) येथील वस्ताद नगर परिसरात दोन गटांमध्ये लाकडी दांडक्यासह जोरदार मारामारी झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा प्रकार सकाळी साडेदहा ते दुपारी दोन च्या दरम्यान झाला. यावेळी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. या प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी 10 जण तसेच एक चारचाकीही ताब्यात घेतली आहे. या मारामारीत कोणीही विशेष गंभीर जखमी झाले नसून रात्री उशिरापर्यंत परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्याचे काम सुरू होते. याबाबत पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, जकातवाडी, (ता. सातारा) येथील वस्ताद नगर परिसरामध्ये एका बाजूला गोसावी समाजाची वस्ती आहे. जकातवाडी परिसरात गोसावी आणि मराठा समाजाच्या दोन गटांमध्ये जुन्या वादातून गेल्या एक वर्षापासून वातावरण धुमसत होते. याला निवडणुकीतील भांडणांचेही निमित्त होते. गुरुवारी गोसावी समाजाच्या एका महिलेची छेड काढण्याचे निमित्त होऊन दोन गटांमध्ये येथे तुंबळ मारामारी झाली. गावात भर रस्त्यावर दोन गट लाकडी दांडकी आणि इतर काही शस्त्रे घेऊन एकमेकांच्या अंगावर आल्याने जोरदार मारामारीला सुरुवात झाली. सुदैवाने या मारामारीमध्ये फारसे कोणी जखमी झाले नसल्याची माहिती मिळत आहे. प्रसार माध्यमांवर या मारामारीची माहिती झळकताच सातारा शहर व सातारा तालुका पोलीस ऍक्शन मोडवर आले. सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे, सातारा शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के आणि जलद प्रतिसाद पथक हे तात्काळ गावात घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जकातवाडीचा संपूर्ण परिसर सील करत तातडीने मारामारी करणार्‍यांचा शोध सुरू केला. या प्रकरणी दुपारी चार वाजेपर्यंत सातारा पोलिसांनी 10 जणांची धरपकड केली आहे. पोलिसांनी याबाबत माहिती घेतली असता जागेतून ये-जा करण्यावरुन वाद होताच, त्यात गोसावी समाजाच्या एका महिलेची छेड काढल्याचे निमित्त झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. तसेच या दोन्ही गटांमध्ये निवडणुकीतील जुन्या भांडणाचाही राग होता. त्याचे पर्यवसन गुरुवारी सकाळी भांडणामध्ये झाले. जकातवाडी परिसरामध्ये दिवसभर या भांडणामुळे उलटसुलट चर्चेचे वातावरण होते. पोलीस दाखल होताच त्यांना जमाव आटोक्यात आणण्यासाठी सौम्य लाठीमारही करावा लागला. सातारा शहर आणि सातारा तालुका पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गावातून पथसंंचलन केले. यामध्ये एक चारचाकी गाडीही ताब्यात घेण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दहाजणांना सायंकाळी सातारा तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत याबाबत परस्परविरोधी तक्रारी नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

  

Share