कांडलीच्या सुमित्रा आहकेच्या कलेचा सन्मान:मेळघाटच्या वारली पेंटिग्ज, व्याघ्र चित्राची राष्ट्रपतींकडून प्रशंसा

कांडलीच्या सुमित्रा आहकेच्या कलेचा सन्मान:मेळघाटच्या वारली पेंटिग्ज, व्याघ्र चित्राची राष्ट्रपतींकडून प्रशंसा

वारली पेंटिग्ज् आणि व्याघ्र प्रकल्पातील जंगल तसेच वन्यजीव संपदेला चित्राच्या माध्यमातून समाजापुढे आणणाऱ्या सुमित्रा आहकेला तब्बल १५ दिवस राष्ट्रपतींच्या अतिथी म्हणून दिल्लीच्या राजभवनात राहण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्यांच्या अंगी असलेल्या घरगुती कलेचा सन्मानही राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आला. गौरखेडा कुंभी येथे मुख्यालय असलेल्या ‘खोज’ संस्थेत कार्यरत सुमित्रा आहके या आदिवासी भगीनी उच्चशिक्षित आहेत. रेखाकला हा विषय त्यांनी शालेय शिक्षणापासूनच जपला. त्यामुळे आदिवासी संस्कृतीची ओळ‌ख करुन देणारे वारली पेंटिग्ज्, जंगलातील राहणीमान, वाघाचे महत्व आदी बाबी त्यांच्या चित्रकलेतून नेहमीच समाजासमोर आल्या आहेत. समाजसेवेची आवड म्हणून त्या ‘खोज’ संस्थेतील शैक्षणिक विभागात काम करतात. आदिवासी मुला-मुलींना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांना प्रशिक्षित करणे, बडबड गीते व इतर कलांच्या माध्यमातून शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन्ही तालुक्यांतील खेडे व तांडे हे त्यांचे कार्यक्षेत्र आहे. राष्ट्रपती भवनात अलिकडेच दहा दिवसीय आवासीय कला शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये देशभरातून सुमारे २०० आदिवासी प्रतिनिधींनी सहभाग घेतला. पुढे या प्रतिनिधींमधील निवडक १५ जणांची खास निवड करण्यात आली. विशेष असे की या खास निवडीतील १५ जणांमध्ये सुमित्रा आहकेला गुणवत्तेच्या श्रृंखलेत दुसरे स्थान प्राप्त झाले. त्यांनी तयार केलेले वारली पेटिंग्ज, गाव तसेच शहरातील फरक दर्शविणारे चित्र, देवस्वरुप मानला जाणारा वाघ आणि आदिवासी क्षेत्रातील लुप्त होत चाललेल्या कलाप्रकारांवर टाकलेला प्रकाश राष्ट्रपतींना खूप भावला. त्यामुळे निरोप समारंभावेळी सुमित्रा आहकेंना प्रमाणपत्र, चषक आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. सुमित्रा आहके यांच्या यशामुळे अमरावती जिल्ह्याच्या सन्मानात मानाचा तुरा खोवला गेला असून या यशाबद्दल खोज संस्थेचे प्रमुख ॲड. बंड्या साने, सामाजिक कार्यकर्त्या ॲड. पूर्णीमा उपाध्याय, ब्रदर जोस आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment