काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का:धंगेकर, थोपटे नंतर युवक काँग्रेसमध्येही नाराजी; आणखी एका पदाधिकाऱ्याचा राजीनामा

काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का:धंगेकर, थोपटे नंतर युवक काँग्रेसमध्येही नाराजी; आणखी एका पदाधिकाऱ्याचा राजीनामा

देशातील लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यात अनेक पक्षांतरे होताना दिसत आहेत. यातच राज्यातील काँग्रेसला देखील मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. पुणे काँग्रेसमधील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता भोरचे माजी आमदार आणि काँग्रेसचे प्रमुख नेते संग्राम थोपटे हे देखील भाजपच्या वाटेवर आहेत. संग्राम थोपटे यांचा धक्का काँग्रेसला पचनी पडलेला नसतानाच आता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी देखील पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. महाराष्ट्र प्रदेश व काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून रोहन सुरवसे पाटील हे अनेक दिवसांपासून काम करत आहेत. मात्र त्यांनी आपला राजीनामा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपवला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी याआधी देखील थोपटे यांनी पक्ष न सोडण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. त्यामुळे आता हर्षवर्धन सपकाळ या सर्व प्रकरणाला कसे हाताळतात, हे पाहावे लागेल. गटबाजीला आणि अंतर्गत कुरघोडीला कंटाळून राजीनामा – सुरवसे पाटील या संदर्भात सुरवसे पाटील यांनी म्हटले की, सरचिटणीस पदाचा राजीनामा देणे बाबत … समाजकार्य करून लोकांची आणि विशेषतः युवकांची कामे करण्यासाठी मी कॉंग्रेस पक्षाच्या विचार धारेचे गेली अनेक वर्ष निष्ठेने काम केलं. परंतु आज पक्षातील गटबाजीला आणि अंतर्गत कुरघोडीला कंटाळून मी अतिशय जड अंतःकरणाने माझ्या युवक सरचिटणीस पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मी जाणतो आज पक्ष आणि संघटना अडचणीत आहे. एक सच्चा कार्यकर्ता म्हणून आजवर सर्वांसोबत मिळून मिसळून एकदिलाने काम केलं. युवकांच्या आणि जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलने उभी केली. परंतु आज पक्ष अडचणीत असताना कार्यकर्त्याला राजीनामा द्यावा लागणं दुःखद आहे. पक्ष नेतृत्वाने याचा विचार करावा. संग्राम थोपटे यांचाही काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा काँग्रेसचे पुणे विभागातील बडे नेते तथा माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजप प्रवेशाचा निर्णय पक्का झाल्यामुळे त्यांनी काँग्रेसचा हात सोडला. त्यांनी आपला राजीनामा ईमेलद्वारे पक्षश्रेष्ठींना पाठवला. आता थोपटे आपल्या समर्थकांचा मेळावा घेऊन या विषयीची अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती आहे. संग्राम थोपटे हे भोर – वेल्हे – मुळशी या विधान मतदारसंघाचे सलग 3 वेळा आमदार राहिले होते. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी त्यांना धूळ चारली होती. या पराभवानंतर ते काँग्रेसपासून दूर गेले होते. ही संधी साधून भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांनी त्यांच्या मध्यस्थीने त्यांची भाजपशी जवळीक वाढली. त्यातून त्यांचा भाजपच्या नेतृत्वाशी संपर्क झाला आणि आता अखेर भाजप नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment