करगोट्यातून इज्जत निसटण्याच्या वयात..:तुम्ही अमित शहांच्या पाठीवर वळ उठवणार?, आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका

करगोट्यातून इज्जत निसटण्याच्या वयात..:तुम्ही अमित शहांच्या पाठीवर वळ उठवणार?, आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका

शिवसेना पक्ष प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या अंधेरी येथील क्रीडा संकुलात गुरुवारी शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. विधानसभेचा निकाल मला पटलेला नाही. मधल्या काळात अब्दाली येऊन गेले. अमित शहा. ते म्हणाले महाराष्ट्रातला विजय उद्धव ठाकरेंना जागा दाखवणारा आहे. जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय असतो ते तुम्हाला भविष्यात दिसेल, असे म्हणत त्यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला होता. यावर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आशिष शेलार यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, श्रीमान उद्धव ठाकरे यांचा जन्म 27 जुलै 1960 चा आहे. त्यामुळे 1951 साली स्थापन झालेल्या जन संघाविषयी त्यांना काही माहिती असण्याचे कारण नाही. 5 आणि 6 एप्रिल 1980 रोजी दिल्लीत जन संघाच्या नेत्यांची बैठक होऊन नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय झाला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांचे वय 20 वर्षे होते त्यामुळे याबाबत त्यांना काही माहिती असण्याचे कारण नाही. पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले, फोटोग्राफी करण्यात दंग असलेल्या आणि ‘करगोट्यातून इज्जत निसटण्याच्या वयात’ असतानाच्या काळातील संदर्भ देऊन बोलणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आमचे सांगणे, तुम्ही कुठे जन संघ आणि भाजपच्या स्थापनेवर बोलता? 100 वर्षे पूर्ण करणाऱ्या संघावर बोलता? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभरात देशाच्या बहुमान उंचावला तसेच भाजप जगात एक नंबरचा पक्ष ज्यांनी करून दाखवला त्या अमितभाई शहा यांच्यावर बोलता? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. आशिष शेलार म्हणाले, समाजवाद्यांची पुस्तके वाचून महाराष्ट्र आणि जनसंघाचा इतिहास तुम्हाला कळणार नाही. श्रीमान उद्धव ठाकरे तुम्ही अमितभाई शहा यांच्यावर पाठीवर वळ उठवणार आहात? कसले? केव्हा? आधी तुम्ही तुमचे वडील म्हणजे अखंड हिंदूंचे आशास्थान वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा 26 जुलैच्या पुरात अडकले होते, तेव्हा तुम्ही मिठी नदीच्या पुराला ‘पाठ दाखवून’ पंचतारांकित हॉटेलमध्ये पळालात त्या दुर्दैवी घटनेचे वळ तुमच्या पाठीवर आणि आयुष्यावर खूप खोल आहेत, ते कधीतरी मातोश्रीच्या आरशा समोर उभे राहून पहा. कंत्राटदारांकडून कटकमिशन खाऊन मुंबईचा जो बट्याबोळ केलात त्याचे व्रण दोन कोटी मुंबईकरांच्या काळजावर आहेत त्याच्या सुरकुत्या तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर दिसतात का? हे पण आरशाला विचारुन पहा. मग कळेल जखमा खोल आहेत.. की… तुमच्या मेंदूतच झोल आहे, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment