कर्नाटकच्या उडुपीत संस्कृतसह तीन भाषांत प्रशिक्षण:वेद-शास्त्रांसह संगणक, विज्ञानाचे शिक्षण; परदेशात बनणार पुरोहित

वैदिक मंत्र उच्चारांनी सकाळ होते. दुपारी संगणकाचे धडे गिरवले जातात. सोबतीला विज्ञान आणि गणिताचे अवघड प्रश्न सोडवतात… पहिले ते आठवीत शिकणारे हे विद्यार्थी पौरोहित्यात करिअर करत आहेत. कर्नाटकातील उडुपी शहरात श्री पुथीगे सुगुना शाळेचा प्रत्येक विद्यार्थी ३ भाषा इंग्रजी, संस्कृत व कन्नड बोलू, लिहू आणि वाचू शकतो. उडुपी पुथुगे मठाचे व्यवस्थापक एचएच सुगुनेंद्र तीर्थ पर्याय स्वामीजी सांगतात की- अमेरिका, ऑस्ट्रेलिया व युरोपियन देशांत हिंदू लोकसंख्या वाढत आहे. मंदिरांची संख्याही वाढत आहे. मात्र पुरोहित आणि आचार्य यांची कमतरता जाणवते. या देशांत स्थायिक झालेल्यांची भारतीय संस्कृतीशी नाळ कायम राहावी यासाठी आम्ही विद्यार्थी घडवत आहोत. येथील विद्यार्थी या शिक्षणामुळे खूप आनंदी आहेत. समाजासाठी शिक्षण… पर्यावरणाची जबाबदारी आणि प्राण्यांवर दया करायला शिकवले जाते पुरोहित बनण्यासाठी आलेल्या या विद्यार्थ्यांना अनुष्ठान-कर्मकांडासह कर्तव्य आणि नैतिकतेचे ज्ञान दिले जाते. त्यांना प्राण्यांप्रति दया आणि ज्येष्ठांचा सन्मान करण्याचे धडे दिले जातात. मानव आणि निसर्गादरम्यान परस्पर अवलंबित्व, शिस्तप्रिय, चिंतनशील जीवनशैलीच्या वैदिक दृष्टिकोनाचीही ओळख करून दिली जाते. मठाचे स्वामी प्रसन्नाचार्य सांगतात की, आता सर्व विद्यार्थी ब्राह्मण समाजातील आहेत. मात्र आम्हाला आशा आहे की भविष्यात देशाच्या सर्व भागातील, सर्व जातींचे विद्यार्थी येथे येतील. ज्ञान-विज्ञानासह पुरोहित बनण्याचे प्रशिक्षण घेतील.’ ९ वर्षांपूर्वी या शाळेची स्थापना करण्यात आली. शाळेचे एनआयओएस अंतर्गत संचालन होते. मठाने बंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि हिरियडकातही शाळा उघडल्या. त्यात २५० विद्यार्थी शिकतात. येथे राहणे-भोजन, शिक्षणाची वर्षाची फीस १६ हजार रुपये आहे.