कारस्थानी तहव्वूर राणाची चौकशी सुरू, कडेकोट बंदोबस्तात ठेवले:हेडली, हाफिज सईद, आयएसआयच्या भूमिकेची ‘एनआयए’कडून तपासणी

एनआयएने मुंबईच्या २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसेन राणा याची चौकशी सुरू केली आहे. अमेरिकेतून प्रत्यार्पण करून दिल्लीला आणलेल्या तहव्वूरला कोर्टाने १८ दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवले आहे. एनआयएच्या डीआयजी तथा मुख्य तपास अधिकारी जया रॉय यांच्या नेतृत्वाखाली त्याची चौकशी सुरू आहे. त्याला पाकिस्तानी-अमेरिकी दहशतवादी डेव्हिड हेडली, लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित ३० पेक्षा जास्त प्रश्न विचारले गेले. तहव्वूरची विशेष कोर्टात पेशी झाली असता एनआयएने सांगितले की, त्याने २६/११ सारख्या अनेक हल्ल्यांचे कट रचले होते. एजन्सी १७ वर्षांपूर्वीच्या घटनांचा तपास करण्यासाठी त्याला त्या ठिकाणांवर नेऊ शकते, जिथे तो २००८मध्ये गेला होता. अमेरिकी परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो म्हणाले, आम्ही राणाला भारताकडे दिले आहे जेणेकरून तो मुंबई हल्ल्याच्या कटाच्या आरोपांचा सामना करेल. आम्ही दीर्घ काळापासून हल्ल्यात प्राण गमावलेल्या १६६ लोकांसाठी न्याय मागत आहोत, त्यात ६ अमेरिकी होते. परराष्ट्र मंत्रालय प्रवक्त्या टॅमी ब्रूस म्हणाल्या, या हल्ल्याने जगाला हादरवून सोडले होते. प्रश्न.. भारतात कुठे-कुठे गेला, मदतगार कोण? तहव्वूर १३ ते २१ नोव्हेंबर २००८ दरम्यान पत्नीसोबत भारतात कोणत्या शहरांमध्ये गेला आणि या दरम्यान कोणकोणाला भेटला? आयएसआयच्या टार्गेटवर मुंबईच होती की अन्य शहरेही? एनआयए मुख्यालयात ठेवले, २४x७ देखरेख सुरक्षेच्या कारणास्तव तहव्वूरला दिल्लीत एनआयए मुख्यालयात देखरेखीखाली ठेवले. त्याच्यावर २४x७ नजर ठेवली जातेय. कोर्टाने दर २४ तासांनी त्याची वैद्यकीय तपासणी व दुसऱ्या दिवशी वकिलाला भेटण्याची परवानगी दिली. एनआयएने २००९ मध्ये राणा, हेडली व इतरांविरुद्ध खटला दाखल केला होता. दहशतवाद्यांसाठी‘निशान-ए-हैदर’ची तहव्वूरची इच्छा होती मुंबई हल्ल्यानंतर तहव्वूर हेडलीला म्हणाला होता, भारतीयांचे हाल असेच व्हायला हवेत. त्याने ठार झालेेल्या नऊ तोयबाच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार ‘निशान-ए-हैदर’ देण्याची मागणी केली होती. तहव्वूरला दहशतवादी कट रचण्यासाठी अमेरिकेत १४ वर्षांची शिक्षा झाली होती. अमेरिकेने बेड्यांमध्ये कैद राणाचा फोटो शुक्रवारी जारी केला. तहव्वूरला आणताना पाकिस्तानी दहशतवादी संघटनांकडून धोका असल्याने संपूर्ण प्रक्रिया गुप्त ठेवली. एनआयए व एनएसजी कमांडो विशेष विमानाने गेले. पूर्ण प्रवासात अधिकारी त्याचा हात धरून होते.
त्याला अमेरिकेतून घेऊन आलेले चार्टर्ड जेट पाक हवाई सीमा टाळून भारतात पोहोचले. मात्र, परतीच्या प्रवासात पाकिस्तानच्या वरून यूएईला गेले.