अजित पवारांना परत घेणार का?:शरद पवार म्हणाले – त्यांच्याशी आमचा वैयक्तिक सलोखा राहील, राजकीय सलोखा राहणार नाही
विधानसभा निवडणुकीनंतर समीकरणे बदलू शकतात, अशी विधाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेत्यांनी केली होती. त्यामुळे अजित पवार हे पुन्हा शरद पवारांकडे जाऊ शकतात, अशा चर्चा रंगत आहेत. या सर्व मुद्द्यांवर शरद पवारांनी आपली भूमिका मांडली आहे. मोदी सत्तेत असेपर्यंत तरी अजित पवार किंवा त्यांच्यासोबत गेलेले नेते वेगळा निर्णय घेणार नाहीत. त्यांच्याशी आमचा केवळ वैयक्तिक सलोखा राहील, राजकीय सलोखा राहणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. शरद पवार यांनी मुंबई तक ला दिलेल्या मुलाखतीत युगेंद्र पवारांना निवडणुकीत का उभे केले, अजित पवारांना धडा शिकवणार की, त्यांना परत सोबत घेणार या प्रश्नांवर उत्तरे दिली आहेत. शरद पवार म्हणाले. अजित पवारांना धडा शिकवण्यासाठी युगेंद्र पवारांना पुढे केले नाही. भाजपसोबत गेलेले आमचे सहकारी आमच्या वैचारिक चौकटीत बसू शकत नाहीत. त्यांच्याशी आता केवळ वैयक्तिक सलोखा असेल. राजकीय सलोखा राहणार नाही. अजित पवार गटाविरोधात ईडीचा वापर
भाजपने अजित पवारांना सोडले, तर परत घेणार का? या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, अजित पवारांना सोडण्याचा विचार काही लोक करतील, असे मला वाटत नाही. कारण आज पुस्तकामध्ये एक गोष्ट प्रसिद्ध झाली आहे. आम्हा लोकांच्या मागे ईडीची चौकशी लागली होती. त्यामुळे आम्हाला भाजपसोबत जाण्यावाचून गत्यंतर नव्हते, असे भुजबळ यांनी स्पष्टे केल्याचे शरद पवार म्हणाले. मी स्वत: तुरुंगात होतो. तेथून सुटल्यावर माझा पुर्नजन्म झाला, असेही भुजबळ म्हणाले होते. यावरून ईडी आणि सरकारी यंत्रणांचा वापर सत्ताधारी पक्षाने यांच्याविरोधात केला, हे स्पष्ट होते. ईडीला तोंड देण्यासंबंधी त्यांच्यात शक्ती नव्हती. त्यामुळे त्यांनी तिकडे जाण्याचा राजकीय निर्णय घेतला, असेही शरद पवार म्हणाले. मोदींची सत्ता असेपर्यंत तरी त्यांचा निर्णय बदलणार नाही
अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी माझ्याकडे येणार नाहीत. दिल्लीत मोदींची सत्ता असेपर्यंत तरी त्यांचा निर्णय बदलणार नाही. अजित पवार गटातील कुणीही वेगळा निर्णय घेणार नाही, असेही शरद पवार म्हणाले. हे ही वाचा… शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे फार आवश्यक:शरद पवार म्हणाले – मनमोहन सिंगांना समजावून सांगितले, तेव्हा 70 हजार कोटींची कर्जमाफी झाली युपीएचे सरकार असताना शेतकऱ्यांना 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर झाली होती. ही कर्जमाफी कशी मिळाली, त्यासाठी काय केले, याबाबतचा किस्सा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितला. मी कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव दिला होता. त्यावेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत बातम्या आल्या होत्या. त्यानंतर मी मनमाहेन सिंग यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत चर्चा केली. त्यानंतर ही कर्जमाफी देण्यात आली, असे शरद पवार यांनी सांगितले. पूर्ण बातमी वाचा…