खराडी बायपास चौकात ट्रॅक्टर-दुचाकीचा अपघात:दुचाकीवरील 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू, ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

एका भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी युवकाचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील खराडी भागात घडली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सिद्धार्थ हुल्लाजी घावटे (वय १९, रा. साडेसतरानळी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत त्याचा मित्र सूरज राठोड (वय २७, रा. आव्हाळवाडी, वाघोली, नगर रस्ता) याने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सूरज आणि त्याचा सहप्रवासी मित्र सिद्धार्थ हे नगर रस्त्यावरील खराडी भागातून जात होते. त्या वेळी खराडी बायपास चौकात दुचाकीला पाठीमागून ट्रॅक्टरने धडक दिली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी सिद्धार्थ गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक चेतन भोसले तपास करत आहेत. विहिरीत उडी मारून ज्येष्ठाची आत्महत्या पुणे शहरातील विश्रांतवाडीतील धानोरी भागात विहिरीत उडी मारुन एका ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. दशरथ पाचू बारवते (वय ६०, रा. भैरवनगर, आनंद पार्क, धानोरी, विश्रांतवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरीतील कुकरेजा सोसायटीच्या परिसरातील विहिरीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू केले. बारवते यांचा मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी याबाबतची माहिती मुलाला दिली. बारवते यांना दारू पिण्याचे व्यसन होते. त्यांच्या मणक्याची शस्त्रक्रिया झाली होती. आजारपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता आहे. ते बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती, अशी माहिती विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांचन जाधव यांनी दिली.