खासदार विशाल पाटलांच्या विधानाने उंचावल्या भुवया:म्हणाले- भविष्यात मी कॉंग्रेससोबत नाहीतर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन, मलाही मंत्रिपद मिळेल

मुंबईच्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सांगली येथे डिजिटल मीडियाचे राज्य अधिवेशन पार पडले. यावेळी सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी एक विधान केले, ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. जयकुमार गोरे प्रथम अपक्ष आमदार झाले आणि मी प्रथम अपक्ष खासदार झालो, मलाही मंत्रिपद मिळेल. भविष्यात मी कॉंग्रेससोबत नाहीतर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन, असे विशाल पाटील यांनी म्हटले. त्यांच्या या विधानाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे त्यांना निवडून आणण्यासाठी कॉंग्रेसच्या विश्वजित कदम यांनी अप्रत्यक्ष मदत केल्याची देखील चर्चा होती. सांगली येथील श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इंस्टीट्यूटमध्ये अधिवेशन पार पडले. यावेळी विशाल पाटील यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे संजय भोकरे उपस्थित होते. यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले, मंत्री जयकुमार गोरे हे सांगलीचे जावई आहेत. आमच्या शेजारी गोरेची सासरवाडी आहे. गोरे पण प्रथम अपक्ष म्हणून आमदार म्हणून निवडून आले, मी पण आज प्रथमच अपक्ष खासदार म्हणून निवडून आलोय. भविष्यात मी काँग्रेससोबत नाहीतर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन. जसे गोरेंना मंत्रिपद भेटले तसे मला देखील पुढे जाऊन मंत्रीपद मिळेल. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण झाले होते. ही जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळाली होती, मात्र कॉंग्रेस नेत्यांनीच या निवडणुकीत आघाडी धर्म पाळला नसल्याची टीका केली गेली. तसेच विशाल पाटील यांना निवडून आणण्यासाठी कॉंग्रेस नेते विश्वजित कदम यांनी अप्रत्यक्ष मदत केल्याची देखील चर्चा रंगली होती.
विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांना मदत केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी विश्वजित कदम यांना टोला देखील लगावला होता. स्टेजवर एक आणि खाली एक भूमिका घेणे, योग्य नाही, असे जयंत पाटलांनी विश्वजित कदम यांना सुनावले होते. याच सोबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विश्वजित कदम यांच्यात देखील शाब्दिक चकमकी उडाल्या होत्या.